माजी मुख्यमंत्री म्हणतात, "आळंदी पॅटर्न' राज्यात राबवा 

plasma-therapy
plasma-therapy

आळंदी (पुणे) : कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी आळंदी (ता. खेड) शहरातील खासगी डॉक्‍टरांना आरोग्य विभागाने सहभागी करून घेतले आहे. त्याद्वारे आळंदी ग्रामीण रुग्णालयात सुरू केलेल्या "फ्ल्यू क्‍लिनिक'मध्ये आळंदीकरांची दररोज मोफत तपासणी होत आहे.

या "आळंदी पॅटर्न'चे कौतुक खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "कोविड 19 टास्क फोर्स'च्या संदर्भातील एका पत्रकार परिषदेत केले. राज्यात सर्वत्र या पद्धतीचा अवलंब करावा, अशी सूचनाही सरकारच्या आरोग्य विभाग आणि राज्य सरकारला त्यांनी केली. अशाच प्रकारे कार्य नगर जिल्ह्यातील संगमनेर येथेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

आळंदी- चऱ्होली डॉक्‍टर असोसिएशनतर्फे आळंदी ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या आवश्‍यक तपासणीसाठी "फ्लू क्‍लिनिक' सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आळंदी चऱ्होली डॉक्‍टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास खेबडे पाटील व सचिव डॉ. अंबालाल पाटील, डॉ. नितीन जाधव, डॉ. श्रीकांत कुऱ्हाडे, असे एकूण 34 डॉक्‍टर व आळंदी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करून या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार मोफत फ्ल्यू क्‍लिनिक पॅटर्न स्वयंस्फूर्तीने राबवण्यात आला आणि 2 एप्रिलपासून या पॅटर्नवर प्रत्यक्ष कार्य सुरू झाले. 

या उपक्रमात 34 डॉक्‍टरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांची खासगी डॉक्‍टरांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयात रोज सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मोफत तपासणी करून सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सल्ला व औषधोपचार करत आहे. हे "फ्ल्यू क्‍लिनिक' सोडून कोणत्याही खासगी रुग्णालयात यावर सल्ला व औषधोपचार केला जात नाही. जेणेकरून कोरोना संशयित रुग्णांमुळे इतर नागरिकांना त्याचा प्रसार होणार नाही. त्यामुळे तपासणीसाठी नागरिकांना ग्रामीण रूग्णालयाशिवाय आधार नव्हता. त्यामुळे या "फ्ल्यू क्‍लिनिक'चा उपयोग नागरिकांना झाला. या "फ्लू क्‍लिनिक'च्या आवारात सोशल डिस्टन्सिंग, हेंड हायजिन, रेस्पिरेटरी हायजिन यावर काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. रोज साधारण 30 ते 40 रुग्णांवर तपासणी केली जाते. 

चऱ्होली, मोशी, दिघीसारख्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडले. मात्र, आळंदीत वेळीच फ्ल्यू क्‍लिनिक सुरू केल्याने एकही कोरोना रुग्ण सध्या तरी नाही, हे या पॅटर्नच यश आहे. त्यामुळे आळंदी आणि परिसरातील नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप अशा तपासणीसाठी थेट ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासणी करण्याचे आवाहन केले जात आहे. 

या आळंदी पॅटर्नसाठी परिश्रम करणारे आळंदी- चऱ्होली डॉक्‍टर्स असोसिएशनमधील सर्व पदाधिकारी, खासगी स्वयंसेवक डॉक्‍टर, उपविभागीय अधिकारी संजय तेली, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भुमकर, आळंदी ग्रामीण रुग्णालयातील प्रशासन व यामध्ये कार्यरत असणारे नगरपालिका कर्मचारी वर्ग, आळंदी ग्रामीण रुग्णालयातील लॅब व एक्‍स रे टेक्‍निशियन या सर्वांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान आहे. 

आळंदीतील बांधकाम व्यावसायिक शकूर हकीम यांनी या डॉक्‍टरांना फ्ल्यू क्‍लिनिकमधे काम करण्यासाठी आवश्‍यक पीपीई किट खरेदी करण्यासाठी सव्वालाख रुपयांची आर्थिक मदत केली. आळंदी देवस्थाननेही पीपीई किटसाठी पन्नास हजारांची मदत केली. तसेच, नगरसेवक सचिन गिलबिले यांनी औषधासाठी मदत केली. तसेच, आळंदी पॅटर्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे डॉक्‍टर सेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका यांनी विशेष प्रयत्न केले. 

विलास काटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com