मृत्यूच्या दाखल्यांसाठी हेळसांड करण्याचा आळंदी पॅटर्न सध्या आहे चर्चेत

विलास काटे
Monday, 12 October 2020

मृत्यूच्या दाखल्यासाठी हेळसांड करण्याचा आळंदी पॅटर्न सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी सुरू केल्याचे चित्र आहे.

आळंदी : कूटूंबातील व्यक्ती नैसर्गिक मृत्यू पावल्यानंतर पालिकेकडून मृताचा दाखला मिळविण्यासाठी अनेक प्रयास करावे लागत आहे. यासाठी अर्जासोबत स्थानिक डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे डिक्लेरेशन केल्याबाबतचा दाखला जोडावा लागतो. मात्र फॅमिली डॉक्टर घरी येवून मृतदेह तपासण्यास नकार देतात. तर ग्रामिण रूग्णालयातील कर्मचारी मृताचा मृतदेह दवाखान्यात घेवून घ्या सल्ला देतात. मृतदेह नेल्यावर इसीजी काढावा लागेल. पोस्ट मार्टेम करावा लागेल असे सांगून नातेवाईकांना गर्भगळित करतात. रात्री अपरात्री जर मृत्यू झाला तर व्यक्तीच्या मृत्यू दाखल्यासाठी आळंदीकरांना वणवण करावी लागत आहे. मृत्यूच्या दाखल्यासाठी हेळसांड करण्याचा आळंदी पॅटर्न सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी सुरू केल्याचे चित्र आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यूचा दाखला मिळवण्यात नागरिकांना काहिच अडचण नाही. मात्र जर वयस्कर व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला तर मग प्रवास सुरू होतो तो टोलवाटोलवीचा. यामध्ये मग काही राजकीय मंडळीही कानावर हात ठेवून शासकीय नियमच आहे. तसा आम्ही काही करू शकत नाही अशी बोळवण करतात. जवळच्या नातेवाईकांना मात्र असे दाखले नियम धाब्यावर बसवून दिले जातात. सर्वसामान्यांना मात्र हेलपाट्याशिवाय हाती काहीच नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ज्येष्ठांचे मृत्यू सध्या घरीच होत आहे. वार्ध्यक्याने मृत्यू झाला. डॉक्टर तेवढे आमच्या माणसाला तपासा अशी कुटूंबियांकडून विनवणी केली तरी फॅमिली डॉक्टर असूनही तपासणीस नकार दिला जात आहे. मागील तीन आठवड्यापूर्वी माऊली पार्कमधील शहरातील एका नव्वदीच्या पुढील ज्येष्ठाचा रात्री सव्वानऊच्या सुमारास घरीच नैसर्गिक मृत्यू झाला. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना तपासणीसाठी बोलावले असता. आम्ही घरी येवू शकत नाही. तुम्हीच मयताची बॉडी दवाखान्यात आणा असे सांगितले. मृतदेह दवाखान्यात नेल्यानंतर दरवाजातून ईसीजी काढावा लागेल. पोस्टमार्टेम करावा लागेल असे उपदेश संबंधित कर्मचा-यांकडून दिला गेला. यावर गलितगात्र झालेल्या नातेवाईकांनी राजकिय वजन वापरले. मग सरकारी डॉक्टरांनी मृतदेह तपासला आणि व्यक्ती मयत असा दाखला दिला.

दरम्यान, जवळपास असाच अनुभव अनेकांना मागील काही महिन्यात आला. गावठाणातील दोन महिलांच्या दाखल्याबाबत अशाच पद्धतीने टोलवाटोलवी केली. ओळख नसेल तर डॉक्टर तपासणार नाहीत आणि सरकारी लोकही प्रतिसाद देत नाहीत. पालिकेतही मृत्यूच्या दाखल्यासाठी अशाच पद्धतीने टोलवाटोलवी केली जाते. लोकप्रतिनिधीही नागरिकांचे काम जलद व्हावे यासाठी प्रयत्नशिल नाहीत. एकंदर मृत्यूचा दाखल्यासाठीची वणवण मात्र झारीतील शुक्राचार्यांमुळे चालूच आहे. ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणपत जाधव म्हणाले, ''रूग्णालयात उपचार घेत असेल तरच मदत करू शकतो. अन्यथा मयताच्या नातेवाईकांनी फॅमिली डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदी विकास मंचचे संदिप नाईकरे यांनी सांगितले की, ज्येष्ठ व्यक्ती मृत झाल्यानंतर रात्रीअपरात्री मृतदेह दवाखान्यात बोलविणे आणि ईसीजी, पोस्ट मार्टेमचा सल्ला अमानवीय आहे. दुखाच्या प्रसंगी नागरिकांना कमीत-कमी त्रास होईल याचे भान संबंधितांनी ठेवणे अपेक्षित आहे.'' 

नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले, ''लोकप्रतिनिधींची शिफारस आणि मृताच्या वारसाचे प्रतिज्ञापत्र घेवून नागरिकांची हेळसांड थांबवणे गरजेचे आहे.'' याबाबत मुख्याधिकारी अंकूश जाधव म्हणाले, ''ज्येष्ठांच्या नैसर्गिक मृत्यूबाबत मयत दाखला देण्यासाठी हेळसांड होवू नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांशी बोलून प्रक्रिया सुलभ करू.''

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Alandi pattern of neglect for death certificates is currently under discussion