

आळंदी, ता. २१ : दिवेआगार येथील दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन दिघी सागरी पोलिस ठाण्यात आळंदीतील विनर्स अकॅडमीचे संस्थापक-शिक्षक अमर आदक, त्यांच्या पत्नी यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर गोटीराम आदक (वय २९), शिल्पा अमर आदक (वय ३०), मृणाल सुरेश नारखेडे (वय ३०), सबा महबूब इनामदार (वय २७), वैष्णवी मृणाल नारखेडे (वय २८) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत. सर्व आरोपी हे आळंदीमध्ये विनर्स अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. याबाबतची फिर्याद केळगाव (ता. खेड) येथील पोलिस पाटील युवराज बबनराव वहिले (वय ४२) यांनी दिघी सागरी पोलिस ठाण्यात (जि. रायगड) दिली असून गुन्ह्याची नोंद रविवारी (ता. १८) पावणेचारच्या सुमारास करण्यात आली. आळंदीतील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील दिवेआगार बीच येथे सहलीसाठी गेले होते. या वेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडून मृत पावले होते. पुढील तपास दिघी सागरी पोलिस करत आहेत.
बेजबाबदारपणा भोवला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनर्स अकॅडमीचे संस्थापक-शिक्षक अमर आदक, मृणाल नारखेडे आणि इतर आरोपींनी त्यांच्या क्लासमधील अकरावीच्या विद्यार्थ्यांची सहल रायगड किल्ला आणि श्रीवर्धन बीच येथे घेऊन जात असल्याचे पालकांना सांगितले होते. मात्र, त्याबाबत कोणतेही पूर्वनियोजन करण्यात आले नाही. रायगड किल्ला येथे रोपवे बंद असताना त्याचे शुल्क घेऊन मुलांना पायरी मार्गे गडावर पायी नेण्यात आले. तसेच श्रीवर्धन बीचऐवजी दिवेआगार बीचच्या निर्जन स्थळी नेऊन, विद्यार्थ्यांना पाण्यामध्ये पोहता येत नसल्याची माहिती असूनही कोणतेही सुरक्षिततेचे साधन न पुरवता आणि निष्काळजीपणे, बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांना समुद्राच्या पाण्यात खेळण्यासाठी पाठवले. त्याचबरोबर स्वतः आरोपीही पाण्यात उतरले. त्यानंतर आठ विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.