आळंदी तब्बल अडीच तास वाहतूक कोंडी

आळंदी तब्बल अडीच तास वाहतूक कोंडी

Published on

आळंदी, ता. २० : लग्नातील वऱ्हाडींच्या रस्त्यावर लागलेल्या अस्ताव्यस्त गाड्या, औद्योगिक वाहतुकीची अवजड वाहने, बेशिस्त वाहन चालक, वाहतूक विभागाचे नियोजनाचा अभाव, विविध कारणांमुळे आज आळंदीत सायंकाळच्या वेळेस तब्बल अडीच तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीचा सामना कामगार, विद्यार्थी, भाविक तसेच वऱ्हाडींना करावा लागला.

आज आळंदीत लग्नाची संख्या जास्त होती. तसं अनेक मंगल कार्यालयांना स्वतःची पार्किंग नसल्याने कार्यालयात आलेली वाहने स्वाभाविकपणे रस्त्यावर उभी केली जातात. याचबरोबर सायंकाळी चाकण, धानोरे, मरकळ औद्योगिक भागातून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही मोठी होती. एकाच वेळी वाहनांची गर्दी झाल्याने सायंकाळी पाच नंतर तब्बल साडेआठ पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. चाकण मार्गे येणारी वाहतूक हनुमानवाडी, केळगाव, आळंदी भागात कोंडी जाणवली. वडगाव रस्त्याला वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. आळंदी-मराठवाडा रस्त्यावर सर्वाधिक औद्योगिक वाहने तसेच कामगार, विद्यार्थ्यांच्या वाहनांची वर्दळ असल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले. तर पुढे देहू फाटा चौकामध्ये सिग्नल असल्यामुळे तसेच रस्त्यात आजूबाजूला रिक्षावाले, किराणा दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या केल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यातच वाहतूक विभागाचे पोलीस पूर्ण क्षमतेने काम करत असूनही नियोजनाचा अभाव वाहतुकीच्या बाबतीत आळंदी शहरासाठी दिसून येतो.अनेक ठिकाणी शाळा सुटल्यानंतर घरी येणारे विद्यार्थी, कामावरून सुटल्यानंतर घरी जाणारे कामगार तसेच येथे दिवसभर लग्नासाठी आलेले वऱ्हाडी पुन्हा माघारी जाताना वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र दिसते, त्याचप्रमाणे शुक्रवारी (ता. २०) सायंकाळनंतर असेच चित्र होते. देहू फाटा, चाकण चौक भागातून रुग्णवाहिका काढताना चालकाला दिव्यमार्गातून गेल्याचा अनुभव आला. रुग्णवाहिका ही नीट जाऊ शकत नाही अशी अवस्था संध्याकाळच्या वेळेत आळंदीत दिसून येते. यामुळे औद्योगिक भागातील उद्योजक वर्गही आळंदीच्या वाहतूक कोंडीवर नाराज असून त्यांचाही उत्पादन क्षमतेवर परिणाम दिसून येतो. वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून कामगार, विद्यार्थी यांचा वेळेचा अपव्यय होणार नाही.

वाहतूक कोंडीची कारणे :
मंगल कार्यालयांना स्वतःचे पार्किंग नसल्याने बहुतांश गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या.
अवजड वाहनांची संख्या लक्षणीय.
वाहतुकीच्या तुलनेत चाकण आळंदी पुणे रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक.
दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव.
चाकण कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे.
बाह्यवळण पुलाच्या दुरुस्तीचे काम मंद गतीने.

Marathi News Esakal
www.esakal.com