आळंदीतील कचराडेपो पुन्हा पेटवला
आळंदी, ता. २२ : मागील तीन महिने जळत असलेला कचरा अद्याप धुमसत आहे. जळालेल्या कचऱ्याची राख थंड होत नाही तोवर शनिवारी (ता. २१) रात्री समाजकंटकांनी कचरा पुन्हा पेटवला. रात्रीच्या वेळी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात वाहत होते. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्वच्छता निरीक्षकास या आगीच्या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या आदेश रविवारी (ता. २२) दिले आहेत.
गेली वर्षभर आळंदी शहराच्या कचरा डेपोवर सरकारच्या निर्देशानुसार प्रक्रिया करण्याऐवजी तो जाळूनच नष्ट केला जात आहे. वर्षभरात कचरा जळणाऱ्या विरुद्ध एकही तक्रार पोलिसांमध्ये अद्याप नगरपरिषदेकडून दिली गेली नाही. यामुळे नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभाग जबाबदारीने काम करत नसल्याचे चित्र आहे. कचरा डेपोवर लाइट नाही, संरक्षणार्थ कुंपण नाही, सीसीटीव्ही यंत्रणा नाही किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करणारी चांगली मशिनरी नाही असे चित्र पाहायला मिळते. असे असूनही माझी वसुंधरा अंतर्गत नगरपरिषदेला पुणे विभागात चौथा नंबर मिळवला. कचरा जाळून नंबर मिळतो का, अशी चर्चा आळंदी शहरात नागरिक करू लागले आहेत. कचऱ्याच्या धुरावाटे येणारी वायू प्रदूषणाने शहरातील काही नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री कचरा डेपोला पुन्हा आग लागली होती. यात कचरा डेपोवर नव्याने टाकलेला कचराही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. नगरपरिषदेकडे अशी कोणतीही यंत्रणा आगीच्या घटना रोखण्यासाठी किंवा होऊच नये यासाठी कार्यरत नाही. दरम्यान, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षकास आगीच्या घटनेचे कारण शोधून आणि तत्पूर्वी पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. तसेच आळंदी नगरपरिषद वगळता अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत तसेच हॉटेल व्यवसायिक, कारखानदार, बांधकाम व्यावसायिक यांच्यामार्फत परस्पर घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेत टाकला जाणारा कचरा यावर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक विशेष लक्ष द्यावे, असेही आदेश मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिले आहेत.
नगरपरिषदेने नुकताच सर्वसाधारण सभेत ठराव केला असून घनकचरा व्यवस्थापन बाबत नव्याने प्रक्रिया राबवली जाईल. आगीच्या घटना रोखण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जाईल.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद
आळंदी नगरपरिषद खासगी कंपनीकडून पाण्याचे जोड या सरकारी गायरानात घेणार असून शासकीय दराने त्याचे भाडे दिले जाईल. संपूर्ण कचरा डेपोला कचऱ्याचे कुंपण घालून बंदिस्त केले जाईल.येत्या दोन ते चार दिवसांत पाण्याची व्यवस्था कचरा डेपोच्या जागीच होईल. आगीच्या प्रसंगाच्या वेळी या पाण्याचा वापर तातडीने करता येईल.
-माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
२०१४ पासून वीज बिलाचे २७ लाख थकीत
आळंदी देवस्थानच्या गायरानातील घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेतील वीज बिलाचे २०१४ पासून २७ लाख रुपये थकीत रक्कम नगरपरिषदेकडून महावितरणला देणे आहे. यामुळे बरेच महिने वीजजोड बंद होते. याबाबत मुख्याधिकारी खांडेकर म्हणाले की, महावितरणला विनंती करून वीजजोड जोडण्यास सांगितले आहे, तसेच नगरपरिषद टप्प्याटप्प्याने थकीत बिल भरणार असून पुढील आठवड्यामध्ये याची कार्यवाही सुरू होईल.

