

आळंदी, ता. २० : प्रदक्षिणा रस्त्यावर जागेच्या वादातून काही दिवसांपूर्वी एका मजुराचा त्याच्याच सोबत असलेल्या अन्य एका मजुराने खून केला. या घटनेमुळे तीर्थक्षेत्र आळंदीतील बेवारस मजूर आणि त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आळंदी तीर्थक्षेत्र असल्याने येथे रोजगारासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र, निवाऱ्याची सोय नसल्याने अनेक मजूर इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्ता आणि सिद्धबेट परिसरात उघड्यावर वास्तव्यास असतात. परिसरात अवैध दारूची सहज उपलब्धता असल्याने मद्यप्राशन करून आपापसात भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही इंद्रायणी घाटावर अशा हिंसक घटना घडल्या आहेत.
इंद्रायणीचा दगडी घाट, प्रदक्षिणा रस्ता आणि सिद्धबेट परिसर सध्या मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले आहेत.
घाटावर भाविकांचे कपडे चोरीला जाणे आणि मद्यपींचा वावर वाढल्याने वारकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अनेक मजूर उघड्यावरच वास्तव्य करतात, जिथे किरकोळ कारणावरून दगडफेक आणि रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारीच्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी हॉटेलच्या ओट्यावर झोपण्याच्या कारणावरून झालेल्या खुनाने या असुरक्षिततेवर शिक्कामोर्तब केला आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांनाही या मद्यपींमुळे घाटावर फिरणे कठीण झाले आहे. परिसरात अवैध दारूविक्री जोमाने सुरू असून, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाने या बेवारस मजुरांच्या निवाऱ्याची सोय करावी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी इंद्रायणी घाट परिसरात कडक गस्त घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.