लोगो - ‘आंतरराष्ट्रीय भ्रूण अल्कोहोल स्पेक्ट्रम विकार’ जनजागृती दिन

लोगो - ‘आंतरराष्ट्रीय भ्रूण अल्कोहोल स्पेक्ट्रम विकार’ जनजागृती दिन
Published on

गर्भावस्थेत मद्यसेवन बाळासाठी धोक्‍याचे

स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला; मेंदूच्या विकासावर परिणाम होण्याची भीती

पुणे, ता. ८ : गर्भावस्थेत मद्यसेवन केल्यास गर्भाशयात विकसित होणाऱ्या बाळाच्या मेंदूसह इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो. गर्भावस्थेदरम्यान आईने सेवन केलेले मद्य हे वारेच्या (प्लॅसेंटाच्या) माध्यमातून गर्भापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे गर्भावस्थेतील बाळावर परिणाम होतो. त्‍यासाठी संपूर्ण नऊ महिने अल्कोहोलमुक्त राहण्याचा संदेश स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
नऊ सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय भ्रूण अल्कोहोल स्पेक्ट्रम विकार’ अर्थात ‘फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स’ (एफएएसडी) जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांचे प्रतीक म्हणून नऊ सप्टेंबर हा दिवस निवडला आहे. या दिनानिमित्त गर्भधारणेचा विचार करणाऱ्या तसेच गर्भवतींमध्ये अल्कोहोलच्या सेवनाबाबत जनजागृती केली जाते.
स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांच्या मते, गर्भावस्थेतील बाळाच्या मेंदूचा विकास हा अत्यंत नाजूक आणि सातत्याने सुरू असलेला टप्पा असतो. अशा वेळी मद्याच्या संपर्कामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम बाळाची शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि वर्तणुकीवर दीर्घकालीन स्वरूपात होऊ शकतो. यामध्ये बाळाची वाढ खुंटणे, शिकण्यात अडचणी, स्मरणशक्तीच्या समस्या, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी आणि वर्तणुकीतील बदलांचा समावेश होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल किंवा जन्मजात विकृतीही दिसून येऊ शकतात. ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ हा या विकारांमधील गंभीर प्रकार मानला जातो. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वांत सुरक्षित उपाय असल्याचे डॉक्टर सांगतात.

“गर्भावस्थेदरम्यान मद्याच्‍या संपर्कामुळे होणाऱ्या विविध शारीरिक, बौद्धिक, वर्तणुकीशी संबंधित आणि विकासात्मक समस्यांना एकत्रितपणे ‘भ्रूण अल्कोहोल स्पेक्ट्रम विकार’ म्‍हणतात. हा एकच विकार नसून, मद्याच्‍या संपर्कामुळे बाळाच्या विकासावर होऊ शकणाऱ्या विविध परिणामांचा समूह आहे. काही गंभीर प्रकरणांमध्ये चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल किंवा जन्मजात विकृतीही आढळू शकतात. यातील ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ हा अधिक गंभीर प्रकार मानला जातो.’’
- डॉ. अर्चना कंकल, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, मणिपाल रुग्णालय

‘‘गर्भधारणेचा विचार करताना आणि गर्भावस्थेदरम्यान महिलांनी मद्यसेवन पूर्णपणे टाळावे. गर्भधारणा झाल्याचे समजण्यापूर्वी मद्यपान केले असेल, तर घाबरून न जाता आतापासून ते पूर्णपणे बंद करावे आणि स्त्रीरोगतज्ज्ञांशी मोकळेपणाने चर्चा करावी. गर्भावस्थेत दारूला नकार देणे हे आईच्या सुरक्षिततेसाठी आणि बाळाच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.’’
- डॉ. मुग्धा पारसनीस, स्त्रीरोग व आयव्हीएफ तज्ज्ञ, केईएम रुग्‍णालय

‘‘गर्भावस्थेत मद्यपानाचे सुरक्षित प्रमाण, सुरक्षित प्रकार किंवा सुरक्षित कालावधी निश्‍चित नाही. मद्य प्लॅसेंटामधून बाळापर्यंत पोहोचून विकसित होत असलेल्या मेंदूसह इतर अवयवांवर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘फक्त एक पेग’ घेण्याचाही धोका पत्करू नये. निरोगी बाळासाठी नऊ महिने शून्य मद्यपान हा सर्वांत योग्य निर्णय आहे.’’
- डॉ. स्नेहा त्रिवेदी, स्त्रीरोगतज्ज्ञ, नोबल रुग्‍णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com