मद्यधुंद डॉक्‍टर "ऑन ड्यूटी' गटारात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

येणेरे (ता. जुन्नर) येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्‍टर ग्रामस्थांना सापडले ते चक्क रस्त्याकडेच्या गटारात. "ऑन ड्यूटी' दारूच्या नशेत तरर्र असलेल्या या महाभागाची "पालखी' गावकऱ्यांनीच जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेऊन तेथे त्याच्यावर "उपचार' केले. 

आपटाळे : येणेरे (ता. जुन्नर) येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्‍टर ग्रामस्थांना सापडले ते चक्क रस्त्याकडेच्या गटारात. "ऑन ड्यूटी' दारूच्या नशेत तरर्र असलेल्या या महाभागाची "पालखी' गावकऱ्यांनीच जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेऊन तेथे त्याच्यावर "उपचार' केले. 

वेळ सकाळ साडेदहाची. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होण्याची हीच वेळ असल्याने गावातील रुग्णांची पावले तिकडे वळू लागली. काही जण केंद्रात पोचलेही; पण तेथे आरोग्य अधिकारीच नव्हता. तो थोड्याच वेळात येईल, असं तेथे पोचलेल्या रुग्णांना वाटत होतं; पण आपलं "कर्म'च फुटकं असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली, तो डॉक्‍टर दारू पिऊन गटारात पडल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली तेव्हा. गटारात पडलेल्या डॉक्‍टरला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

गावातील जबाबदार लोकांनी ऍम्ब्युलन्स बोलावून या मद्यधुंद डॉक्‍टरची "पालखी' उचलून जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेऊन ठेवली. तेथे या महाशयांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्ताचे नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

दरम्यानच्या काळात राजकीय पदाधिकारी व वरिष्ठांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सर्वांनीच एका सुरात या महाशयांवर कारवाईची मागणी केली. स्थानिकांचे म्हणणे होते की, हे महाशय केव्हाच रुग्णालयात उपलब्ध नसतात. कायमच ते मद्यधुंद अवस्थेत आढळतात. त्यावर पदाधिकाऱ्यांनी या डॉक्‍टरची शेलक्‍या शब्दांत कानउघाडणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcoholic doctor in the "on duty"