
आपटाळे : जुन्नर तालुक्यातील जनतेच्या हक्काचे पाणी राखून ठेवत उर्वरित पाणी अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात सोडावे. पाणी प्रश्नाबाबत जुन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्याय केल्यास शासनाविरोधात भविष्यकाळात तीव्र आंदोलन झेडण्याचा इशारा जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी रविवार ता 14 रोजी दिला. कुकडी प्रकल्पाच्या पाणी प्रश्नासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकजूट होऊन जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले.
याबाबत आंदोलन कर्त्यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कुकडी प्रकल्पातील सद्यस्थीतीतील पाणीसाठ्या बाबत योग्य माहिती न देता त्यांची सही घेऊन आवर्तन सोडण्याबाबतचा आदेश काढला आहे.
माणिकडोह धरणात सद्यस्थितीत 1200 एमसेफ्टी इतका पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी 880 एमसेफ्टी इतका साठा सोडण्यात येणार आहे. वडज धरणातून 50 एमसेफ्टी तर पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठा मोठ्या प्रमाणात काढणार आहे.
तर माणिकडोह धरणातून रविवार ता 14 रोजी रात्रीच्या सुमारास आवर्तन सुरु करण्यात येणार असल्याने भविष्यात जुन्नरवासियांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार असल्याने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकी मध्ये झालेल्या चर्चेविषयी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ऑड संजयराव काळे म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील शेतकरी व रहिवासी यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. वडज धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे, तो काढण्यात यावा.
हेकेखोरपणाने जुन्नर तालुक्यातील नागरिकांच्या हक्काचे पाणी नेण्याचा प्रयत्न करून अन्याय केल्यास तालुक्यातील जनता शांत बसणार नाही. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशा बुचके यावेळी म्हणाल्या की, प्रशासनाकडून पालकमंत्री यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून भूमिका घेणार असून याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणार आहे.
काँग्रेस चे तालुकाध्यक्ष अशोकराव घोलप म्हणाले की, राजकीय मतभेद विसरून तालुक्यातील जनतेच्या हितासाठी पाण्याची लढाई एकत्रितपणे लढणे गरजेचे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे म्हणाले की,
पाणी सोडण्यास विरोध नाही मात्र हक्काचे पाणी राखून ठेवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. जुनरचे माजी नगरसेवक समीर भगत यांनी सांगितले की, जुन्नर शहराला दररोज 45 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहरातील 80 टक्के नागरिक माणिकडोह धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक ऑड संजयराव काळे, जिल्हा नियोजन च्या सदस्या आशा बुचके, बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब पारखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत, राजेंद्र भगत यांसह विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.