बारामतीतील सर्व शाळा सुरु होण्यास 1 डिसेंबर उजाडणार

मिलिंद संगई
Tuesday, 24 November 2020

बारामतीत कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचा आजपर्यंतचा आकडा नगण्य असल्याने शिक्षण संस्थांमध्ये आता उत्साहाचे वातावरण आहे. 

बारामती : कोरोना तपासणीमुळे शाळांचे वेळापत्रक कोलमडले असून बारामती शहर व तालुक्यातील सर्व शाळांचे कामकाज 1 डिसेंबरपासून सुरु होईल. बारामतीत कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचा आजपर्यंतचा आकडा नगण्य असल्याने शिक्षण संस्थांमध्ये आता उत्साहाचे वातावरण आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार शाळा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली आज बारामती शहर व तालुक्यात वेगाने सुरु होत्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची कोरोना चाचणी पूर्ण करण्यासाठी 27 नोव्हेंबर उजाडेल, असा अंदाज असल्याने आता 1 डिसेंबरपासूनच शाळा ख-या अर्थाने सुरु होतील. 

29 नोव्हेंबरला रविवार तर 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीची राष्ट्रीय सुटी असल्याने शाळांची घंटा 1 डिसेंबरपासूनच खणाणेल, अशी शक्यता आहे. दरम्यान ज्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत, त्यांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे. 

दरम्यान बारामती तालुक्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या 82 शिक्षणसंस्था असून यात 1240 शिक्षक व 390 शिक्षकेतर कर्मचारी अशा 1630 जणांचा समावेश आहे. या पैकी आज बातमी लिहीपर्यंत 548 शिक्षकांची तर 178 शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून 726 जणांची तपासणी पूर्ण झाली होती, यात दिलासादायक बाब म्हणजे अवघे तीनच जण पॉझिटीव्ह आले आहेत. हे प्रमाण नगण्य असल्याने आजपर्यंत तरी सर्वांनाच दिलासा होता. 

इतर तालुक्यातील शिक्षकांचाही ताण...
बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली, रुई ग्रामीण व वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना तपासणी केंद्रावर बारामती व्यतिरिक्त इतर तालुक्यातूनही शिक्षक तपासणीसाठी येत असल्याने या केंद्रावरील ताण वाढला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी आहे आकडेवारी....
•    बारामतीतील शिक्षक 1240 तर शिक्षकेतर कर्मचारी 390
•    आजपर्यंत 548 शिक्षक व 178 शिक्षकेतर कर्मचा-यांची तपासणी पूर्ण
•    726 तपासण्यात अवघे तीन जण कोरोनाग्रस्त. 
•    27 नोव्हेंबरपर्यंत सर्व चाचण्या पूर्ण होण्याचा अंदाज. 
•    1 डिसेंबरपासून सर्व शाळा सुरु होण्याचा अंदाज. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All schools in Baramati will start on December 1