पुण्यातील दुकानदारांसाठी आनंदाची बातमी; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

आठवड्याच्या सातही दिवस सर्व दुकाने खुली राहणार .

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासूनची पुणे व्यापारी महासंघाच्या मागणीला अखेर यश आले. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने पी 1 पी 2 ऐवजी आठवड्याच्या सातही दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत खुली करण्यास महापालिकेने मंगळवारी परवानगी दिली. त्यामुळे बुधवारपासून शहरातील सर्व दुकाने आता खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने शहरातील लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शासनाकडून हळूहळू काही व्यवसाय सुरू करण्यात परवानगी दिली. ऑनलॉक एक आणि दोन मध्ये व्यवसायांना परवानगी देताना मात्र दुकाने पी 1 पी 2 पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यास व्यापारी महासंघाने विरोध केला होता. तसेच अन्य पर्याय देखील सुचविले होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. 

दरम्यान, आज महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका ,सचिव महेंद्र पितळिया व विपुल अष्टेकर यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुणे शहरात पी 1 पी 2 या पद्धतीला व्यापाऱ्यांचा विरोध असून आम्हाला आता पूर्वीप्रमाणे मुक्तपणे सातही दिवस व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी आग्रहाची मागणी केली. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना फोनवर सूचना दिल्या. 

त्यानुसार आयुक्तांनी सायंकाळी या संदर्भातील आदेश काढले. सणासुदीचा काळ व मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापाऱ्यांचा मागणीस पाठिंबा देऊन सहकार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हा अधिकारी नवल किशोर राम,महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आभार व्यापारी महासंघाच्या वतीने मानण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All shops will be open in Pune seven days a week