esakal | पुस्तकांना घरपोच वितरणास परवानगी द्या; मराठी प्रकाशक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बोलून बातमी शोधा

Books
पुस्तकांना घरपोच वितरणास परवानगी द्या; मराठी प्रकाशक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करावा आणि लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुस्तके ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. शिक्षण, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी पुस्तकाचे अतूट नाते आहे. लॉकडाऊनमुळे सध्या नागरिक घरात बसून आहेत. शिवाय घरात दूरचित्रवाणी आणि मोबाइलशिवाय अन्य साधने उपलब्ध नाहीत. सध्या पुस्तक विक्रीची दुकाने बंद आहेत. यामुळे पुस्तक विक्री आणि प्रकाशन व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात पुस्तकांना अद्याप जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा मिळाला नसल्याने घरपोच वितरण करता येत नाही. कागद हा कोरोना विषाणूचा वाहक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या १ मेपासून सुरू होणाऱ्या नवीन लॉकडाऊनमध्ये पुस्तक वितरणासाठी सूट मिळावी, अशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी असल्याचे बर्वे यांनी सांगितले.