

पुणे, ता. २ : ज्या शाळेने शिक्षण दिले, संस्कार केले आणि आयुष्याचा पाया घातला, त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेत एकत्र येऊन शिक्षकांची भेट घ्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा आणि शाळेच्या विकासासाठी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.
दिवाळीच्या या आपुलकी आणि नात्यांना उजाळा देणाऱ्या सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळांतील माजी विद्यार्थ्यांनी दिवाळी पाडव्याला आपल्या जुन्या शाळेत एकत्र येण्याची संकल्पना जिल्हा परिषदेने मांडली आहे. अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. त्यांच्या यशाचा पाया ज्या शाळेत रचला गेला, त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला पुस्तके, शैक्षणिक साहित्य, संगणक आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करावे. आर्थिक मदतीबरोबरच सध्याच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
योगदान देण्याची वेळ
माजी विद्यार्थ्यांचे छोटेसे योगदानही शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दिवाळी पाडव्याच्या भेटीचे स्वरूप केवळ स्नेहमेळाव्यापुरते मर्यादित न ठेवता शाळेच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करावा. शाळेने आपल्याला घडविले, आता पुढील पिढी घडविण्यासाठी योगदान देण्याची वेळ आहे. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या शाळेशी पुन्हा नाते जोडून सामाजिक बांधिलकी जपावी, असेही जगदाळे आणि पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.