पुन्हा "हर्बेरियम' नव्या संकल्पनेत! 

sunil-barve
sunil-barve

पुणे - "हो! "हर्बेरियम' पुन्हा अवतरणार आहे; पण कदाचित नव्या संकल्पनेत!' सुनील बर्वेंच्या या उत्तराने आनंदित होत उपस्थित नाट्यरसिकांनी यावर टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या "सुबक'द्वारे निर्मित "अमर फोटो स्टुडिओ' या नव्या नाटकावरील जाहीर चर्चेत "हर्बेरियम'विषयी विचारलेल्या एका प्रश्‍नाला ते उत्तर देत होते. "वाइड विंग्ज मीडिया' व "एलान एंटरटेन्मेंट'ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सिद्धेश पूरकर या कलावंतांशिवाय या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व संगीतकार गंधार संगोराम हेही सहभागी झाले होते. समीक्षक राज काझी यांनी या चर्चेचे संचालन केले. 

सुनील बर्वेंच्या "हर्बेरियम' या संकल्पनेतून, गाजलेल्या जुन्या पाच नाटकांच्या नामवंत कलावंतांच्या संचात नव्या दिमाखात मोजकेच प्रयोग दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी केले. मराठी नाट्यरसिकांनी या सर्व प्रयोगांना "हाउसफुल' दाद दिली होती, या पार्श्‍वभूमीवर या मालिकेत नव्या प्रयोगांविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. एखादा विषय किंवा "थीम' घेऊन नाटकांची निवड होईल व "हर्बेरियम'ने स्थापित केलेल्या दर्जातच त्यांचे प्रयोग होतील- अर्थात पंचवीसच! बर्वेंनी याबद्दल पुढे सांगितले, की "हे नाटकही त्यासम आनंद देणारे वाटले व या नव्या कलावंतांच्या ऊर्जा आणि ध्यासाचाही मोह पडला म्हणून मी या निर्मितीप्रक्रियेत पुढाकार घेतला.' 

"दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून घरोघरी लाडक्‍या झालेल्या या "टीम'ने सळसळत्या उत्साहात व एकमेकांच्या खिल्ल्या उडवत हा कार्यक्रम रंगतदार केला. "नाटकातही यांच्या या केमेस्ट्रीचे दर्शन घडते' आणि "लेखनापासून "टीम स्पिरीट'चाही प्रयोगात प्रत्यय येतो' असे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारींनी सांगितले. पूजा म्हणाली, की "भूमिकांचे नाटकामधले वैविध्य मला "ऍना'च्या इमेजबाहेर घेऊन गेले!' "अभिनेत्यांनी आपल्या "कंफर्ट झोन' बाहेरच्याच भूमिकांसाठी प्रयत्न करायला हवेत', असे अमेय म्हणाला. 

"भाषेची वेगवेगळी गंमत मला या नाटकात घेता आली' असे आपल्या भूमिकेबद्दल सुव्रतने सांगितले, तर "इतर सर्व कलावंतांच्या भूमिकांच्या वाट्याला आलेल्या "शैली' आणि "कॉस्ट्युम्स'च्या वैविध्यासमोर आपल्या भूमिकेचे कंगोरे शोधण्याचे आव्हान मला सापडले,' असे सखी म्हणाली. सिद्धेश पुरकरने कलावंत म्हणून घडण्याची ही संधी ठरल्याचे नमूद केले. भैरवी खोतने विचारलेले मजेदार प्रश्‍न व घेतलेले "फन गेम्स' या कलाकारांइतकेच उपस्थित श्रोत्यांनाही धमाल मजा देणारे ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com