सरकारनामासाठी-अमरावती
- अमरावती
विरोधकांबरोबरच
मित्रपक्षांशीही ‘लढाई’
(फोटो - NGP26I01991)
- कृष्णा लोखंडे
अमरावतीमध्ये महापालिका निवडणुकीच्या चित्र स्पष्ट होताना, बोटावर मोजण्याइतपत तडजोडी सोडल्या तर सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढतीचा नारा दिला आहे. त्यामुळे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असले तरी मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच होणार आहे.
ही निवडणूक २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी होत असून, लढतीच्या रिंगणात ६६१ उमेदवार आले आहेत. गतवेळी ७५ जागा लढवत ४५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपने यावेळी ६८ उमेदवार उभे केले असून, सहा जागांवर युवा स्वाभिमान पक्षाशी तडजोड करावी लागली. दुसऱ्या बाजूला युवा स्वाभिमान पक्षाने भाजपच्या बारा जागांवर समर्थन जाहीर केले आहे. वरकरणी ही तडजोड असून, अर्ज मागे घेता न आल्याने हे सर्वच उमेदवार रिंगणात चिन्हांसह कायम असल्याने पेच कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतची युती तुटल्याने भाजपला ७२ जागी शिवसेनेचा, तर २९ जागांवर समर्थन दिल्यानंतरही युवा स्वाभिमानचा सामना करावा लागणार आहे.
महाविकास आघाडीतही दुफळी आहे. मोजक्या जागी काँग्रेसने आघाडी ठेवली असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी जागा सोडत त्यांनी आघाडी कायम ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. अन्य ठिकाणी त्यांनाही मित्रपक्षांसोबत लढतीची वेळ आली आहे. मोजक्या जागा सोडल्या तर अन्य ठिकाणी सर्वच पक्षांचे उमेदवार आखाड्यात उतरल्याने मतविभाजन मोठ्या प्रमाणांवर होणार आहे. अपक्षांची संख्याही लक्षणीय आहे.
मित्रपक्षांचेच आव्हान
दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणुका आल्याने सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी होती. विशेषतः भाजपमध्ये ती अधिक प्रमाणात होती, त्यामुळेच बंडखोरीही या पक्षात अधिक झाली. पक्षश्रेष्ठींना पक्षांतर्गत बंडखोरीवर अंकुश मिळवता आला असला, तरी मित्रपक्षांना मात्र वळविण्यात अपयश आले आहे. त्यातुलनेत काँग्रेसला मात्र चांगले यश मिळाले आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरी असल्याने जुन्यांसोबत नव्यांना संधी देता आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोजके उमेदवार देत मर्यादित यशावर लक्ष केंद्रित केले आहे, तर शिंदे यांच्या शिवसेनेने तिकिटांची खिरापत वाटली असल्याने ते फार गंभीर दिसून येत नाहीत. ‘एमआयएम’ने मुस्लिमबहुल भागांत उमेदवार देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण केली आहे.
भ्रष्टाचार, वाहतुकीचे मुद्दे ऐरणीवर
गेल्या चार वर्षात प्रशासक राजवटीत महापालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार, कंत्राटदारांचे वर्चस्व व टक्केवारी या मुद्द्यांसह शहरातील अस्वच्छता, नेहरू मैदान व रेल्वेची जागा बळकावण्याचा प्रयत्न, वाहतुकीसाठी बंद असलेला राजकमल उड्डाणपूल, अवैध ठरलेले जन्म प्रमाणपत्र, मूलभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा, रखडलेली भुयार गटार योजना, रखडलेले इतवारा बाजार उड्डाणपुलाचे बांधकाम, शहर परिवहन सेवा या मुद्द्यांवर ही निवडणूक चांगलीच गाजणार आहे.
अनेक प्रभागांत रंगतदार लढती
- राजपेठ प्रभागातील भाजपचा एक उमेदवार अपात्र ठरल्याने. तर अन्य एका उमेदवारास अधिकृत चिन्ह मिळू न शकल्याने या प्रभागात भाजपची कोंडी झाली आहे.
- जवाहर गेट बुधवारा प्रभागात काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले व भाजपचे माजी सभापती विवेक कलोती यांना ठाकरेंची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने चांगलेच अडचणीत आणले आहे. विलास इंगोले सलग पाच वेळा या भागातून निवडून आले आहेत. तर विवेक कलोती मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आहेत.
- साई नगर अकोली प्रभागातील निवडणूक सर्वांत हायव्होल्टेज झाली आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांना
युवा स्वाभिमान पक्षाच्या सचिन भेंडे यांचे आव्हान आहे. भेंडेविरुद्ध घेतलेले अपात्रतेचे आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका मागे घेण्यास सांगून नियमित निवडणूक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
...............
- अकोला
---------------
बंडखोर बिघडवणार राजकीय गणित
(फोटो - NGP26I01978)
- योगेश फरपट
अर्जमाघारीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र वरवर स्पष्ट झाले असले, तरी प्रत्यक्षात राजकीय समीकरणे अजूनही अस्थिर आहेत. दोन दिवसांत तब्बल १६३ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता ५५६ उमेदवार मैदानात आहेत. मात्र या संख्येपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत ते युती आणि आघाडीतील बंडखोर उमेदवार. हेच बंडखोर या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरणार की एखाद्या पक्षाचा संपूर्ण गेम बिघडवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नाराजांची डोकेदुखी
जागावाटपाच्या प्रक्रियेत अनेक अनुभवी नगरसेवक, इच्छुक नेते आणि स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले कार्यकर्ते डावलले गेले. वरिष्ठ पातळीवर युती-आघाडीचे करार झाले असले, तरी त्याचे पडसाद स्थानिक स्तरावर उमटले नाहीत. परिणामी अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी पक्षादेश धुडकावून लावत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हीच बंडखोरी आता सर्वच प्रमुख पक्षांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. अनेक प्रभागांमध्ये लढत अटीतटीची असून, काही ठिकाणी ५-५० मतांनीही निकाल फिरण्याची शक्यता आहे. अशा वेळी बंडखोरांनी घेतलेली काहीशे मतेही सत्तेचे गणित उलथवून टाकू शकतात.
युती-आघाडीमध्ये गटबाजी
युतीत समन्वयाचा अभाव आणि आघाडीत अंतर्गत गटबाजी हे या निवडणुकीतील ठळक वास्तव आहे. वरिष्ठ नेत्यांनी केलेले करार आणि घोषणांना स्थानिक पातळीवर तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवारांविरोधात त्याच पक्षातील कार्यकर्ते काम करत असल्याचे चित्र आहे. काही प्रभागांमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’, तर काही ठिकाणी उघड बंडखोरी पाहायला मिळत आहे. याचा थेट फटका संघटनात्मक ताकदीला बसण्याची शक्यता आहे. काही बंडखोर उमेदवार स्थानिक पातळीवर अधिक परिचित, सक्रिय आणि लोकसंपर्क असलेले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ‘पक्षाने अन्याय केला’ हा मुद्दा मांडत बंडखोर सहानुभूतीचे राजकारण खेळत आहेत.
स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी
प्रचारात स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत. मनमानी करप्रणाली, अनियमित पाणीपुरवठा, नगर नियोजनातील त्रुटी, वाढते अतिक्रमण आणि हद्दवाढीतील २४ गावांचा अपुरा विकास हे मुद्दे सर्वसामान्य नागरिकांच्या थेट जिव्हाळ्याचे आहेत. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी या मुद्द्यांइतकीच उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, स्थानिक कामांचा लेखाजोखा आणि बंडखोरीची दिशा महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.
रंगतदार लढती
- एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे राजेश मिश्रा यांच्याविरुद्ध भाजपचे करण साहू लढत आहे. मिश्रा यांना शिवसेनेची पारंपरिक ताकद आणि स्थानिक संघटनांचा आधार आहे, तर साहू युवा नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि आक्रमक प्रचाराच्या जोरावर उतरले आहेत.
- प्रभाग क्रमांक २०मध्ये विनोद मापारी यांना भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा फायदा मिळत असताना, शिंदे यांच्या शिवसेनेचे शंकर लंगोटे हे स्थानिक स्तरावर सक्रिय व परिचित चेहरा असल्याने त्यांची बाजूही मजबूत आहे.
- वंचित बहुजन आघाडीचे नीलेश देव यांच्याविरुद्ध भाजपचे सागर शेगोकार या दोन युवा नेतृत्वामध्ये थेट संघर्ष होणार आहे.
- भाजपचे पवन महाले व शिवसेना शिंदे गटाचे राजेश जोशी हे मित्रपक्षांचे नेते आमनेसामने आले आहेत.
- प्रभाग क्रमांक ५मध्ये भाजपचे विजय अग्रवाल यांची निवडणूक वैयक्तिक संपर्क, व्यापारी वर्गाचा पाठिंबा आणि स्थानिक प्रश्नांवर केंद्रित आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दीपक कावरे यांच्याशी त्यांची थेट लढत आहे.
......
- चंद्रपूर
---------------
बंडखोरीमुळे भाजप-काँग्रेसचा कस
(फोटो - NGP26I01951)
- साईनाथ सोनटक्के
अर्जमाघारीनंतर महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, १७ प्रभागांतील ६६ जागांवर युती आणि आघाड्या फिसकटल्या आहेत. तिकीट वाटपातील गोंधळानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील बंडखोर कायम आहेत. बहुरंगी लढती अपेक्षित असून, दोन्ही प्रमुख पक्षांचा चांगलाच कस लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
नगरपालिका निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास बळावलेल्या काँग्रेसने चंद्रपूरमध्ये अन्य पक्षांशी आघाडी करणे टाळले. केवळ जनविकास सेनेला तीन जागा देत उर्वरित ६३ जागा काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आठ जागा दिल्या असून, उर्वरित ५८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवरील मित्रपक्षाला सोबत घेत ३० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्रित येत भीमशक्ती-शिवशक्तीचा नारा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी ५२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष २९ आणि आम आदमी पक्ष २१ जागा लढवीत आहे.
उमेदवारीवरून वादंग
भाजप आणि काँग्रेस पक्षात तिकीट वाटपावरून मोठे वादंग झाले. पण त्यातही भाजपमधील वादंगाचे पडसाद राज्यपातळीपर्यंत उमटले. आमदार किशोर जोरगेवार गटाने आमदार सुधीर मुनगंटीवार गटाच्या उमेदवारांचे तिकीट कापले. काँग्रेस पक्षातील स्थिती वेगळी नाही. येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार विजय वडेट्टीवार समर्थकांचे तिकीट कापले. यातील अनेक नाराज उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. काहींनी तर स्थानिक पातळीवर पॅनेल तयार करून आपल्या पक्षाला शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
गैरव्यवहारांची चर्चा
२९ एप्रिल २०२२ रोजी सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला. निवडणुकीसाठी तत्कालीन विद्यमान आणि इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, सुमारे चार वर्षे प्रशासक राज आहे. मागील दहा वर्षांत चंद्रपूर महापालिका अनेक गैरव्यवहारांनी गाजली. अमृत योजना, घनकचरा संकलन, भूमिगत गटार योजना आदी गैरव्यवहाराचे मुद्दे चव्हाट्यावर आले. मात्र, प्रशासकासह कुणावरही कारवाई झाली नाही. हे सर्व मुद्दे निवडणूक प्रचारात राहण्याची शक्यता आहे. भाजप-काँग्रेस यांच्यातील थेट लढतीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमुळे मतविभागणीचाही परिणाम होऊ शकतो.
रंगतदार लढती
- जिल्हा बँकेच्या नोकरभरतीविरोधात मनोज पोतराजे यांनी १४ दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपची बँकेवर सत्ता आली आहे. एमईएल प्रभागासाठी प्रदेशाध्यक्षांच्या यादीत पोतराजे यांच्या पत्नी पूजा यांचे नाव होते. परंतु, आमदार जोरगेवार यांनी त्यांच्या पत्नीचे तिकीट कापून सविता सरकार यांना रिंगणात उतरविले आहे. पोतराजे यांनी पत्नी पूजा यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही लढतदेखील रंगतदार होणार आहे.
- महाकाली प्रभागात काँग्रेसचे संतोष लहामगे आणि काँग्रेसचे बंडखोर नंदू नागरकर यांच्यातील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
- नियमित जनसंपर्कात असणारे जनविकास सेनेचे पप्पू ऊर्फ प्रदीप देशमुख यांनी काँग्रेससोबत आघाडी केली आहे. ते आणि भाजपचे माजी नगरसेवक देवानंद वाढई यांच्यातील लढत लक्षवेधी होऊ शकते.
- नगीनाबाग प्रभागात भाजपने माजी नगरसेवक बंटी ऊर्फ प्रशांत चौधरी आणि काँग्रेस आमदार सुधाकर अडबाले यांचे भाऊ सुरेंद्र अडबाले यांच्यात काट्याची लढत होईल.
- बंगाली कॅम्प परिसरात अजय सरकार यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे ते पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे रॉबिन विश्वास आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

