Pune Crime : आंबेगाव बुद्रूक येथे अनधिकृत इमले बांधणाऱ्या १० बिल्डरांवर गुन्हे दाखल

आंबेगाव बुद्रूक येथे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बहुमजली निवासी इमारती बांधून त्यांची विक्री करण्यात आली.
Crime
Crimesakal

पुणे - आंबेगाव बुद्रूक येथे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बहुमजली निवासी इमारती बांधून त्यांची विक्री करण्यात आली. या ठिकाणी महापालिकेने कारवाई करून ११ इमारती जमीनदोस्त केल्यानंतर याप्रकरणी १० बिल्डरांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियमातील कलम १९६६मधील ४३ आणि ५२ या कलमान्वये हे गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

आंबेगाव बुद्रूक येथे सिंहगड महाविद्यालयाच्या लगत ११ अनधिकृत निवासी मिळकती बांधण्यात आल्या होत्या. त्यामधील फ्लॅटची संख्या सुमारे ५०० इतकी आहे. या इमारतींचे काम सुरु असताना २०२१ मध्ये बांधकाम विभागाने नोटीस बजावून कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रत्येकी सहा मजली इमारती उभ्या राहिल्या.

या काळात अनेक नागरिकांनी तेथे १८ लाखापासून ते २० लाखापर्यंत सदनिका विकत घेतल्या होत्या. महापालिकेच्या बांधकाम विभागाने डिसेंबरच्या अखेर या ठिकाणी कारवाई करून ४५ हजार ५० चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आमची फसवणूक झाली नसती अशा शब्दात सदनिकाधारकांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, या कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हे दाखल झाले आहे.

हे आहेत गुन्हे दाखल झालेले बांधकाम व्यावसायिक

अनिल भानुदास भवर, मे. साई गणेश डेव्हलपर्सचे अविनाश काळुराम वांजळे, मे. श्रावणी डेव्हलपर्सचे अतुल सुभाष मांगडे, श्री गणेश डेव्हलपर्सचे धनाजी पोपट घाडगे, मे. श्री डेव्हलपर्सचे सुशांत सुभाष वाडेकर, साईनाथ डेव्हलपर्सचे प्रवीण सुरेश कोंढरे, मे. समर्थ डेव्हलपर्सचे जयप्रकाश ब्रिजराज चौव्हान, दत्तात्रेय सहदू करपे, मे. मोरया डेव्हलपर्सचे संतोष महादेव वांजळे आणि महेश नारायण कोंढरे या १० जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महेश कोंढरे यांच्या या ठिकाणी दोन इमारती होत्या. कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

‘आंबेगाव बुद्रूक येथे अधिकृत इमारती उभ्या करणाऱ्या १० बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील अवैध बांधकामे रोखण्यासाठी आम्ही वारंवार कारवाई करत आहोत.’

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com