पुणे - अमेरिकेतील शेतकरी आधीच वाढता उत्पादन खर्च आणि पडलेल्या शेतीमालाच्या किमतीमुळे अडचणीत आले आहेत. त्यातच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या शेतीमालाचे मुख्य आयातदार असलेल्या चीन, कॅनडा आणि मेक्सिकोसोबत व्यापार युद्ध छेडले आहे.
याचा निर्यातीवर परिणाम तर होणार आहेच शिवाय आयात महाग होऊन निविष्ठा आणि अवजारांच्या किमती वाढणार आहेत. होणारे नुकसान भरून देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज देण्याची मागणी आता अमेरिकेतील शेतकरी करत आहेत.
अमेरिकेची शेतीमाल बाजारपेठ निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अमेरिकेच्या शेतीतून येणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल २० टक्के निर्यातीतून येते. अमेरिकेतून २०२४ मध्ये १७ हजार ६०० कोटी डॉलरच्या शेतीमालाची निर्यात झाली होती. यात सोयाबीन, पशुधन उत्पादने, ट्रीनट्स, फळे, भाजीपाला, धान्य आणि पुशखाद्याचा समावेश होता.
अमेरिकेने २०२४ मध्ये केलेल्या एकूण निर्यातीपैकी ४७ टक्के निर्यात फक्त तीन देशांना झाली होती. हे तीन देश म्हणजे मेक्सिको, कॅनडा आणि चीन. मेक्सिकोला एकूण निर्यातीपैकी १७.२ टक्के निर्यात झाली होती. तर कॅनडाला १६.१ टक्के आणि चीनला एकूण निर्यातीपैकी १४ टक्के शेतीमालाची निर्यात झाली होती. पण नेमकं याच देशांसोबत अमेरिकेचे व्यापारी युद्ध सुरू आहे.
अमेरिकेने मेक्सिको आणि कॅनडावरील आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. मात्र ट्रम्प यांच्या धोरणावर विश्वास नसल्याने कधी काय निर्णय होईल सांगता येत नाही, असे जाणकार सांगत आहेत. चीनवरील आयात शुल्क अमेरिकेने कायम आहे. चीननेही अमेरिकेवर आयात शुल्क लावले. अमेरिकेने चीनच्या आयातीवर १४५ टक्के शुल्क लावले तर चीनने अमेरिकेच्या आयातीवर १२५ टक्के शुल्क लावले आहे.
अमेरिकी सरकारच्या व्यापार युद्धामुळे येथील शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, कापूस आणि इतर शेतीमाल निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे. अमेरिकेच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्के सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाची निर्यात होत असते. तर चीन अमेरिकेच्या सोयाबीनचा मोठा ग्राहक आहे.
आधीच जागतिक बाजारात शेतीमालाच्या किमती मागील दोन वर्षांपासून कमी झाल्या आहेत. आता ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे किमती आणखी कमी झाल्या. तसेच निर्यातही कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा देशातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.
पहिल्या कार्यकाळातील नुकसान
डोनाल्ड ट्रम्प हे २०१७ ते २०२१ या काळातही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. पहिल्या कार्यकाळातही त्यांनी व्यापार युद्ध सुरू केले होते. त्यांच्या या व्यापार युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, या काळात अमेरिकेतून शेतीमालाची निर्यात २ हजार ७०० कोटी डॉलरनी कमी झाली होती. त्या वेळी अमेरिकेच्या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी २३०० कोटी डॉलरची मदत दिली होती.
मोठ्या पॅकेजची अपेक्षा
ट्रम्प सरकारने पहिल्या कार्यकाळात दिलेल्या पॅकेजपेक्षा आता मोठ्या पॅकेजची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. आधीच मागील तीन वर्षांपासून शेतीमालाच्या किमती कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांची गुंतवणूक भरून निघणे मुश्कील झाले आहे. निर्यातीवर परिणाम तर होणारच आहे.
पण आयात शुल्कामुळे निविष्ठा आणि अवजारे आणखी महाग होऊन उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यामुळे हे व्यापार युद्ध जेवढे जास्त काळ चालेल तेवढे जास्त पॅकेजची घोषणा करावी लागेल, असे अमेरिकेतील शेतकरी मागणी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.