पुण्यात अमेरिकन महिलेची मुस्लिम महिलेला शिवीगाळ अन् मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कोणतेही कारण नसताना केवळ मुस्लिम आहेत का ? असे विचारुन मुस्लिम महिलांना शिविगाळ व मारहाण करण्याचा प्रकार एका अमेरिकन महिलेने केला आहे. तिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. संबंधित महिलेने शहरामध्ये दोनदा असे प्रकार केल्याने तिला अमेरिकेला परत पाठविण्याबाबत पुणे पोलिसांनी अमेरिकन दूतावासाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

पुणे : कोणतेही कारण नसताना केवळ मुस्लिम आहेत का ? असे विचारुन मुस्लिम महिलांना शिविगाळ व मारहाण करण्याचा प्रकार एका अमेरिकन महिलेने केला आहे. तिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. संबंधित महिलेने शहरामध्ये दोनदा असे प्रकार केल्याने तिला अमेरिकेला परत पाठविण्याबाबत पुणे पोलिसांनी अमेरिकन दूतावासाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

लुईस जॅमी लायन (वय 43, सध्या रा. लष्कर परिसर, मूळ अमेरिका) असे मारहाण करणार्‍या अमेरिकन महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, 22 वर्षीय डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लुईस लायन हिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रविवारी दुपारी कैम्प परिसरातील क्लोअर सेंटरमधील मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या जिन्यावरुन खाली उतरत असताना एका महिलेने त्यांना तुम्ही मुस्लिम आहात का असे इंग्रजीत विचारले. त्यानंतर तक्रारदार महिलेने हो म्हणताच लुईस यांनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डॉक्टर महिला काही काळ घाबरून गेली. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लुईस यांना बोलावून घेऊन चौकशी करत त्यांना असे न करण्याची तंबी दिली आहे. 

दरम्यान संबंधित महिलेने याच स्वरूपाचा प्रकार यापुर्वीही केला असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सोमवारी इंडियन मुस्लिम फ्रंटचे सदस्य (आएमएफ) मुनवर कुरैशी यांनी संबंधित महिलेविरुद्ध लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तिच्याविरुद्ध कडक कार्रवाईक करण्याची मागणी केली आहे.

मुस्लिम महिलांना शिविगाळ व मारहाण करणारी लुईस लायन ही पर्यटन व्हिसावर पुण्यामध्ये वास्तव्य करीत आहे. मात्र तिच्याकडुन सुरु असलेल्या या प्रकाराबाबत पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत.

"अमेरिकन महिलेकडुन शहरातील मुस्लिम महिलांना शिविगाळ व मारहाण करण्याचे दोन प्रकार घडले आहेत. त्याविषयी तक्रार दाखल आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित महिलेस अमेरिकेला माघारी पाठविण्याबाबत परकीय नागरिक नोंदणी कार्यालयमार्फत अमेरिकन दूतावासकडे पत्रव्यवहार केला आहे." 
- रवींद्र रसाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, लष्कर विभाग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american woman bit Muslim woman at Pune in India