Amey Mansabdar : डिजीटल युगातही वृत्तपत्र छायाचित्रणाचे महत्व अबाधित; अमेय मनसबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amey Mansabdar statement Even in digital age importance of newspaper remains intact pune

Amey Mansabdar : डिजीटल युगातही वृत्तपत्र छायाचित्रणाचे महत्व अबाधित; अमेय मनसबदार

पुणे : छायाचित्रण हे वृत्तपत्र माध्यमाचा अत्यंतिक महत्वाचा भाग आहे. छायाचित्रे हि मुद्रीत माध्यमांना अधिक बळकट करण्याचेच काम करतात. म्हणूनच समाजमाध्यमे, मोबाईल व डिजिटल माध्यमांच्या युगातही वृत्तपत्रातील छायाचित्रांचा दर्जा कायम आहे. मुद्रित माध्यमांतील वृत्तपत्रछायाचित्रणाचे महत्व कायम टिकून राहील.'' असे मत प्रसिद्ध छायाचित्रकार अमेय मनसबदार यांनी मंगळवारी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालन येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन मनसबदार यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, उपाध्यक्ष गणेश कोरे, संदीप पाटील, सचिव रूपेश कोळस, वरिष्ठ छायाचित्रकार रवींद्र जोशी, विश्‍वजीत पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत छायाचित्रकार मुकूंद भुते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मनसबदार म्हणाले, ""मुद्रित माध्यमातील छायाचित्र मनाला निखळ आनंद देऊन जाते. मुद्रीत माध्यमात छायाचित्रांची परिणामकारकता महत्वपुर्ण ठरते. मोबाईल, डिजीटल फोटोग्राफीच्या युगातही मुद्रीत माध्यमांमध्ये दर्जेदार छायाचित्रांचा आग्रह धरण्याची गरज आहे. अशा अधिकाधिक दर्जेदार छायाचित्रांमुळे वृत्तपत्रांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.'' दरम्यान, सदस्यांच्या पाल्यांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. छायाचित्र व चित्रकला प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे गुरुवारपर्यंत (ता.15) खुले असून सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळेत पाहता येईल.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले. तर आभार रूपेश कोळस यांनी मानले.

तन्मय ठोंबरे व हिरा सरवदे प्रथम

छायाचित्र स्पर्धेमध्ये "वृत्तपत्र छायाचित्रकार' या गटात तन्मय ठोंबरे प्रथम, आशिष काळे द्वितीय व शहाजी जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर "हौशी छायाचित्रकार' या गटात हिरा सरवदे प्रथम, मंजुषा कुलकर्णी द्वितीय व अमित गद्रे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.