२०२९पर्यंत भारतातून अंमली पदार्थांची तस्करी उखडून फेकू : अमित शहा

२०२९पर्यंत भारतातून अंमली पदार्थांची तस्करी उखडून फेकू : अमित शहा
Published on

ड्रग्जचे जाळे उद्ध्वस्त करणार

‘नशामुक्त भारत’साठी अमित शहांचा निर्धार

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २२ : भारतातून अमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडून फेकण्यासाठी २०२९पर्यंतचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या कालावधीत देशात एक ग्रॅमही अमली पदार्थ येऊ न देण्याचे आणि भारताचा मार्ग वापरून एक ग्रॅमही अमली पदार्थ बाहेर जाऊ न देण्याचे लक्ष्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी निश्चित केले. अमली पदार्थांविरोधातील लढाईत केवळ जप्तीवर भर न देता तस्करीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या (एएनटीएफ) प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन शहा यांच्या हस्ते आज दिल्लीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ‘नशामुक्त भारत’चा कृती आराखडा महत्त्वाचा असल्याचे अमित शाह यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘बैठकीकडून मोहिमेकडे, अहवालांकडून परिणामांकडे, जप्तीकडून तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याकडे आणि गुन्हा दाखल करण्यापासून दोषसिद्धीपर्यंत पुढे जाण्याची गरज आहे. एएनटीएफला केवळ कारवाई करणारे पथक न ठेवता ‘अँटी नार्को मिशन कमांड’ बनविण्याचे लक्ष्य ठेवावे.’’


तीन टप्प्यांत कारवाईचा बडगा
- अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रवेशबिंदू, आंतरराज्यीय वितरण व्यवस्था आणि जिल्ह्यांमधील स्थानिक विक्रीच्या जाळ्यावर एकाच वेळी कारवाई
- देशातील जिल्ह्यांचे तीन गटांमध्ये वर्गवारी. अमली पदार्थांची निर्मिती किंवा देशात प्रवेश होणारे जिल्हे, वाहतूक मार्गावरील जिल्हे आणि सर्वाधिक सेवन अधिक असलेले जिल्हे अशी वर्गवारी.
- तपासामध्ये आर्थिक व्यवहारांचा आणि डिजिटल संपर्कांवर विशेष लक्ष.
- देशाबाहेरून भारतात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या फरार आरोपींना देशात आणून न्यायालयासमोर उभे करणार
- भारतात राहणाऱ्या परदेशी आरोपींना परत पाठवून काळ्या यादीत टाकण्याची मोहीम
- अमली पदार्थांविरोधातील प्रत्येक माहितीचे कृतियोग्य गुप्तवार्तेत रूपांतर करण्याची पद्धत राज्य पोलिसांच्या कार्यसंस्कृतीचा भाग बनविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com