

हिंदू लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना ‘अमृत’चा आधार
- स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास व प्रशिक्षणाच्या संधी खुल्या
- आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ (पुणे) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रशिक्षणाचा लाभ आता या समाजातील पात्र विद्यार्थी व नागरिकांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागाने गुरुवारी (ता. २०) शासन आदेश जारी केला.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाने यापूर्वी ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. आता या योजनांच्या लाभार्थी घटकांमध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील पात्र घटकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासन आदेशानुसार, हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील असे नागरिक व विद्यार्थी, ज्यांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गात किंवा अन्य कोणत्याही राखीव प्रवर्गात समावेश होत नाही आणि जे स्वतंत्र महामंडळांच्या योजनांचा लाभ घेत नाहीत, त्यांना ‘अमृत’ संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
मात्र, या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या आर्थिक निकष व अन्य पात्रता अटींची पूर्तता करणे बंधनकारक असेल. पात्र लाभार्थ्यांनाच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील पात्र विद्यार्थ्यांचा ‘अमृत’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रशिक्षण योजनांमध्ये समावेश करावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील घटकांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील लिंगायत समाजाला याचा मोठा लाभ होणार असल्याने शासनाच्या या निर्णायेच स्वागत होत आहे.
कोट...
SLC26B29789
हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील युवक-युवती आणि महिलांना विकासाच्या योजनांचा समान लाभ मिळावा, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. समाजातील मोठा घटक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांपासून वंचित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर शासनाने ‘अमृत’ संस्थेमार्फत हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील पात्र युवक व विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.
- आमदार विजयकुमार देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.