
Crime News : चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेत वर्षभरात दुसऱ्यांदा चोरी
नारायणगाव : येथील पुणे - नाशिक महामार्गालगत चौदा नंबर येथील अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्था व अन्य तीन दुकानांचे शटर व दरवाजा अज्ञात चोरट्यांनी उचकटून सुमारे ३४ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम , अर्धा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या दोन समया, आर्या हॉटेल मधील विदेशी दारूच्या तेरा बाटल्या असा मुद्देमाल चोरून नेला .
चोरीची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या वरून चोरीच्या या घटनेत तीन तरुणांचा समावेश आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चौदा नंबर येथील अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेवर दोन सशस्त्र तरुणांनी दरोडा टाकला होता.
व्यवस्थापकाला गोळी मारून करून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम लुटून नेली होती. छातीत गोळी लागल्याने व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर ( वय ५२) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक वर्ष झाले मात्र या चोरीचा अद्याप छडा लागला नाही. असे असताना आज पहाटे पुन्हा दुसऱ्यांदा अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेत चोरीची घटना झाली.
चोरट्यांनी पतसंस्थेतील १७ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. पतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेरात एक चोरटा कैद झाला आहे.अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम भोर यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चौदा नंबर येथील अनंत पतसंस्था, आर्या हॉटेल, डॉ.राजदेव यांचे मेडिकल दुकान, बाळू भोर यांची पान टपरी या चार ठिकाणी चोरी केली.
चोरट्यांनी अनंत पतसंस्थेतील १७ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, डॉ राजदेव यांच्या साई मेडिकलचा सेंट्रल लॉक तोडून एक हजार रुपये, दत्तू गेनूजी भोर यांच्या बंद बंगल्यातील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाक व दोन चांदीच्या समया, आर्या परमिट रूम व बिअर बार मधील १५ हजार रुपयांची रोख रक्कम व तसेच विदेशी दारूच्या तेरा बाटल्या, बालाजी जनरल स्टोअर दुकानातील एक हजार रुपये चोरून नेले.
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी दिली.