राजापूर-गंगातीर्थात काशीकुंडात सापडला प्राचीन शिलालेख

राजापूर-गंगातीर्थात काशीकुंडात सापडला प्राचीन शिलालेख

Published on

गंगातीर्थात काशीकुंडात सापडला शिलालेख
१६–१७ व्या शतकातील; ऐतिहासिक वारशात नव्या नोंदीची भर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ : तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या गंगामाईच्या ठिकाणी असलेल्या चौदा कुंडांपैकी काशीकुंडामध्ये प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. त्या शिलालेखावर ‘चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख नेमक्या कोणत्या कालावधीमध्ये आणि कोणी कोरला आहे याबाबत कोणताही उल्लेख आढळून येत नाही. शिलालेखावरील अक्षरांचे वळणदारपण पाहता हा शिलालेख १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
तालुक्यातील उन्हाळे येथील पवित्र गंगातीर्थक्षेत्री पाताळातून अवचितपणे प्रकटणारी आणि अवचितपणे निर्गमन होणारी गंगामाई जगप्रसिद्ध आहे. सद्यःस्थितीमध्ये उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाई प्रवाहीत असून त्याचे प्रमाण कमी दिसत आहे. मूळ गंगेसह येथे असलेल्या चौदा कुंडांमध्ये काशीकुंडाला विशेष महत्त्व आहे. काशी कुंडामध्ये ज्या ठिकाणी गंगापुत्र कळशीने पाणी घेतात, म्हणजेच कळशी बुडवितात त्या ठिकाणी एका दगडावर शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाची अक्षरे वळणदार असून अद्यापही ती स्पष्ट आहेत.
मेदीनी पुराणामध्ये राजापूरच्या प्रसिद्ध गंगेचा उल्लेख असून सातवाहन राजा गांडरादित्याने या गंगास्थानाचा जीर्णोद्धार करताना येथील चौदा कुंडांचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम केल्याचे मानले जाते. शालिवाहन राजा सोमेश्वर यांनीही गंगास्नावर आपल्या काळात (इ.स. १२५५-१२६५) वस्ती केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दोनदा गंगास्नान केल्याचे उल्लेख काही बखरींमध्ये सापडतात. तसेच १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून गागाभट्टांनी गंगेच्या ठिकाणी विद्वानांची सभा भरवल्याचे ऐतिहासिक दाखल्यांमध्ये आढळून येते.
--------------
कोट
उन्हाळे गंगातीर्थ क्षेत्रीच्या काशीकुंडामध्ये आढळून आलेला शिलालेखावर अक्षरे कोरलेली असली, तरी त्यावर तो नेमक्या कोणत्या कालावधी कोरला गेलेला आहे याचा कोणताही उल्लेख नाही. शिलालेखावरील अक्षरांचे वळणदारपणा पाहता हा शिलालेख १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असण्याची शक्यता आहे.
- अनिल दुधाणे, इतिहास संशोधक आणि शिलालेख वाचक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com