Palasdev News : श्री पळसनाथाच्या प्राचीन मंदिराचे सप्तभूमिज शिखर आले पाण्याबाहेर

उजनीतील साठा कमी होत असल्याने प्राचीन कलेचे होत आहे दर्शन
Palsanath Temple
Palsanath Templesakal
Updated on

पळसदेव - उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असलेल्या पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाच्या प्राचीन मंदिराचे सप्तभूमिज शिखर सध्या पाण्याबाहेर आले आहे. गतवर्षीही हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते.

पाणीसाठा कमी झाल्याने या मंदिराच्या प्राचीन स्थापत्य कलेचा अनुभव नागरिकांना घेता आला. त्यामुळे येथे धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले. त्यानंतर पडलेल्या मुबलक पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आणि पुन्हा हे मंदिर पाण्याखाली गेले.

सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील मंदिराचे सप्तभुमिज शिखर पाण्याबाहेर आले आहे. दिवस उगवताना आणि मावळताना पडणाऱ्या सोनेरी सूर्यप्रकाशामुळे शिखर चमकत असल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पळसनाथाचे हे प्राचीन मंदिर चुना आणि भाजलेल्या विटांमधून बांधण्यात आले आहे. पाषाणी शिळांच्या आधारावर मंदिराचा पाया उभा आहे. तर मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. यावरती व्याल, पज्ञपत्र, स्तंभशाखा, वेलीशाखा, वाद्यसहित गंधर्व आणि सुरसुंदरी आहेत. विरघळ, भग्ननंदी, भग्नमारुती, दशावतार, शिल्पपट, सतीशिला पाषाणावर कोरलेल्या आहेत.

पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, प्राचीन स्थापत्य कलेच्या सामर्थ्याचे दर्शन घडविते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे मंदिर आहे. मात्र या सगळ्या गोष्टी मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आल्यानंतर पहायला मिळतात.

उजनी धरणाच्या बांधणीनंतर १९७५ मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली. यानंतर २४ वर्षांनंतर २००२ मध्ये मंदिर प्रथमच पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. यानंतर २०१३, २०१७, २०२३, २०२४ मध्येही मंदिर पाण्याबाहेर आले होते. सध्या उजनी धरणातून सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून पाणी सोडण्यात येत आहे.

याशिवाय सीना माढा, दहिगाव, बोगदा व मुख्य कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरु आहे. दररोज दहा हजारांहून अधिक क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सुरु असल्याने, धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. पाणी सोडण्याचे प्रमाण कायम राहिल्यास आणि पावसाने ओढ दिल्यास काही दिवसांत मंदिराचा बहुतांश भाग पाण्याबाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com