अंगणवाडीचे प्लॅस्टर पिंपरे खुर्दमध्ये कोसळले

अंगणवाडीचे प्लॅस्टर 
पिंपरे खुर्दमध्ये कोसळले
Published on: 

वाल्हे, ता. ८ : पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथील अंगणवाडी इमारतीच्या स्लॅबचे प्लॅस्टर बुधवारी (दि. ७) दुपारी अचानक कोसळले. जेवणाच्या सुट्टीमुळे बालके नेहमीच्या जागेपासून दूर बसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या अंगणवाडीत दुपारी जेवणाची सुट्टी झाली असता, अचानक मोठ्या आवाजासह स्लॅबच्या काही भागाचे प्लॅस्टर खाली कोसळले. या आवाजाने घाबरलेली बालके रडू लागली आणि एकच गोंधळ उडाला. अंगणवाडी सेविका वर्षा खरात व मदतनिसांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्व बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. घटनेची माहिती मिळताच अनेक पालकांनीही अंगणवाडीकडे धाव घेतली.
‘नेहमीच्या जागीच प्लॅस्टर पडले असते तर अनेक मुले जखमी झाली असती,’ अशी भीती खरात यांनी व्यक्त केली. या घटनेबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिका अरुणा खेडेकर यांना माहिती देण्यात आली. ‘कोणतीही जीवितहानी झाली नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे. इमारतीची पाहणी करून तातडीने कार्यवाही केली जाईल,’ असे खेडेकर यांनी सांगितले.
स्लॅबला काही दिवसांपासून फुगवटा आला होता आणि याबाबत ग्रामपंचायतीला कळवूनही दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप होत आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी इमारतीची तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी व बांधकामाच्या दर्जाची चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

बांधकामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह
अंगणवाडीचे बांधकाम अवघ्या तीन वर्षांपूर्वी झाले आहे. मात्र, बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामपंचायतीकडे यापूर्वीच तक्रारी केल्या होत्या, असे पालकांनी सांगितले. संबंधित ठेकेदाराला याबाबत कळवले असता, त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप रणजित थोपटे, अमोल भोसले, शंकर थोपटे यांच्यासह अनेक पालकांनी केला आहे.

WHL26B08382, WHL26B08383

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com