पुणे - गरोदरपणातील उच्च रक्तदाबामुळे २४ वर्षीय सुनीताच्या (नाव बदललेले) दोन्ही किडन्या (मूत्रपिंड) निकामी झाल्या. किडनी प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयांनी १५ ते २० लाखांचा खर्च सांगितला. अखेर, त्यांना ससूनचा आधार मिळाला व किडनीप्रत्यारोपण झाले. कर्नाटक येथील अंगणवाडी मदतनीस आईनेच मुलीला स्वतःची किडनीदान करून लेकीला पुन्हा एकदा पुनर्जन्म दिला.
हे प्रत्यारोपण ७ ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात पार पडले. जेथे खासगी रुग्णालयात १५ ते २० लाख खर्च सांगितला जात होता तीच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया येथे विविध सरकारी योजना व दात्यांच्या दातृत्वातून अवघ्या लाखभर रूपयांत झाली.
विजयापुरा कर्नाटक येथील अंगणवाडी मध्ये मदतनीस काम करणाऱ्या महिलेने सुनीताचा विवाह २०२१ ला पुण्यातील व्यवसायाने वाहनचालक असलेल्या तरुणाबरोबर लावून दिला. दुसऱ्या वर्षी तिला मुलगी झाली. परंतु, गरोदरपणातील उच्च रक्तदाबामुळे तिचे दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान कर्नाटकातील यशोदा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
त्यासाठी १५ ते २० लाख रुपयांचा खर्च खासगी रुग्णालयांनी सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण सुनीताच्या वडिलांचा आधीच मृत्यू झालेला असून एकटी आई व व्यवसायाने चालक असलेल्या पतीच्या आवाक्याबाहेर हा खर्च होता.
आर्थिक परिस्थितीपुढे हतबल होऊन त्यांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा विचार सोडून फक्त डायलिसिस (आठवड्यातून तीन वेळा रक्त शुध्द करण्याची प्रक्रिया) सुरु ठेवले. हे वर्षभर सूरू होते. दरम्यान, सुनीताच्या पतीला ओळखीच्यांकडून ससून मध्ये अत्यंत कमी खर्चात प्रत्यारोपण होते हे समजल्यानंतर गेल्यावर्षी मार्च महिन्यात चौकशी केली. तपासण्याअंती ७ ऑगस्ट रोजी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आता दोघी मायलेकींची प्रकृती स्थिर आहे.
शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लता भोईर, डॉ. पदमसेन रणबागळे, डॉ. सुरेश पाटणकर, मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. संजय मुंडे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षिरसागर, सिस्टर राजश्री कानडे, मुख्य अधिसेविका विमल केदारी या सर्वांचा सहभाग होता.
ससूनमध्ये हे ३४ वे किडनी प्रत्यारोपण झाले आहे. रुग्णांना रुग्णालयात उपलब्ध नसलेले औषधे, इंजेक्शन्स, शस्त्रक्रिये करिता आवश्यक असलेले साहित्य व प्रत्यारोपण शास्त्रक्रिये नंतरच्या आवश्यक तपासण्यांकरीता खर्चही सवलतीच्या दरांत होतो. त्यामुळे रुग्णांना अत्यंत कमीत कमी खर्च येतो. ज्यांना ससून मध्ये किडनी व यकृत प्रत्यारोपण करावयाचे असेल त्यांनी समाजसेवा अधिक्षक तथा अवयव प्रत्यारोपण समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.
– डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
प्रत्यारोपणासाठी प्रत्येक रुग्णांना पंतप्रधान निधीतून अडीच लाखांची मदत मिळते. तसेच, व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ओसवाल बंधू समाज, मुकुल-माधव फाउंडेशन, रंभा चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्याद्वारे प्रत्येक रुग्णांना आर्थिक मदत मिळते. त्यामुळे गरीब रुग्णांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लाखभर रुपयांमध्ये होऊ शकते.
– सत्यवान सुरवसे, अवयव प्रत्यारोपण समन्वयक, ससून रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.