
Anil Bonde : पवारांनी जाणता राजा बिरूद जबरदस्तीने लावून घेतले; अनिल बोंडे
दौंड : देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्राचा जाणता राजा हे बिरूद जबरदस्तीने लावून घेतले व ते विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार तथा राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.
दौंड शहरात दौंड कृषी महोत्सव २०२३ मध्ये बोलताना डॅा. अनिल बोंडे यांनी ही टीका केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी फक्त बारामती तालुक्याचा विकास केला मात्र विदर्भ आणि मराठवाड्याची कधी चिंता केली नाही.
सिंचनाचा अनुशेष वाढल्याने आत्महत्या वाढल्या. जाणता राजा हे बिरूद जबरदस्तीने लावून घेणारे श्री. पवार यांनी विदर्भातील शेतकर्यांना आत्यमहत्येस प्रवृत्त केले. संपूर्ण राज्यामध्ये सिंचनाचा अनुशेष दूर केला असता तर आत्महत्या टळल्या असत्या. त्यांनी उसाला महत्व दिले कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता.
उसासाठी पुढाकार घेताना त्यांनी कधी सोयाबीन किंवा कापसासाठी पुढाकार घेतला नाही. म्हणून ते आत्महत्येस जबाबदार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैनगंगा - वैनगंगा सिंचन प्रकल्पासाठी ८२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्प जाहीर केला.
त्यांनी कामे सुरू केली, संपादन केले परंतु महाविकास आघाडी सरकार आल्याने कामे बंद पडली होती. परंतु श्री. फडणवीस आता संपूर्ण राज्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे अनिल बोंडे म्हणाले.