लोणी काळभोरमध्ये आढळले आणखी 31 कोरोनाग्रस्त रुग्ण; रुग्णसंख्या पोहोचली...

जनार्दन दांडगे
Thursday, 23 July 2020

- 'लोणी'कर कोरोनाच्या विळख्यात, एका डॉक्टरसह मागील ३६ तासात कोरोनाचे नवे ३१ रुग्ण

- नागरिक व ग्रामपंचायत प्रशासन अद्यापही बघ्याच्याच भूमिकेत

लोणी काळभोर (पुणे) : कोरोनाने 'लोणी'करांच्या मानेभोवतीचा विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली असून, मागील ३६ तासांच्या काळात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या शेजारी असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत एका डॉक्टरसह कोरोनाचे नवे ३१ रुग्ण आढळले. या ३१ रुग्णामुळे या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७० वर पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन ग्रामपंचायत हद्दीत मागील 36 तासात 31 रुग्ण आढळले तरीही दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक मात्र कोरोना आपल्याला स्पर्श करुच शकणार नाही. या अर्विभावात मास्कशिवाय व सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडवत बिनधास्त वावरत आहेत. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले ५० टक्क्यांहून अधिक मित्रमंडळी व नातेवाईक होम क्वारंटाईन होण्याऐवजी बिनधास्तपणे घराबाहेर पडत असल्याने, यापुढील काळात वरील दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी मागील 36 तासात लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत 18 तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत 13 असे एकूण 31 रुग्ण आढळून आले आहे. तर वरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या सत्तरहून अधिक नातेवाईकांचे स्वॅबचे तपासणी रिपोर्ट गुरुवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत येणार असल्याने, वरील दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

सरासरी तासाला एक रुग्ण, समूहात कोरोना वाढतोय...

लोणी काळभोर हद्दीतील एका बड्या रुग्णालयामधील एका डॉक्टरसह लोणी काळभोर परिसरात मागील ३६ तासांत तब्बल अठरा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे वरील दोन्ही ग्रामपंचायतीचा एकत्रित विचार केल्यास, सरासरी तासाला एक रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोणी काळभोर हद्दीतील अठरा रुग्णांत रेल्वेखालील वस्तीवरील एकाच कुटुबांतील नऊ सदस्यांचा समावेश आहे. मागील चार दिवसांपासून लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यावरही रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील तेरा रुग्णांत दोन वेगवेगळ्या कुटुबांतील आठ सदस्यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 31 COVID 19 patients were found in Loni Kalabhor Pune