
पुणे : गोऱ्हे बुद्रुक येथे आणखी एक घरफोडी
किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे आज पहाटेच्या वेळी पांडुरंग नागु मरगळे यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. चाळीस हजार रोख व साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरगळे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे जेवण करुन सर्वजण घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले. घराला बाहेरुन कुलुप लावलेले होते. पहाटे मरगळे यांचा मुलगा उठून खाली आला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बाहेरून जाऊन घरामागे पाहिले असता मागचा दरवाजा उघडा होता व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. मुलाने आवाज दिल्यानंतर घरातील इतर सदस्य व आजुबाजुला राहाणारे नागरिक गोळा झाले. घराची मागची खिडकी तोडून चोरांनी घरात प्रवेश केला होता व चोरी केल्यानंतर ते पुढचा दरवाजा आतून बंद करून मागच्या दरवाजाने पळून गेले.
सदर घटनेबाबत हवेली पोलीस ठाण्याला कळविण्यात आल्यानंतर सकाळी सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार निलेश राणे, विलास प्रधान व पोलीस नाईक राजेंद्र मुंढे हे घटनास्थळी दाखल झाले होते. चोरांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असून हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस तेगबीरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम याबाबत अधिक तपास करत आहेत.
अगोदरच्या मोठ्या घरफोडीचा तपास अद्याप लागलेला नाही
मरगळे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कापरे वस्तीवर मागील सुमारे वर्षभरापूर्वी मोठी घरफोडी झाली होती. परगावी गेलेल्या कापरे यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे दहा ते पंधरा तोळे सोने व रोख रक्कम चोरांनी लंपास केली होती. त्या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नाही. अशातच आणखी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Another Burglary At Gorhe Budruk Worth Lakh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..