
पुणे : सिंहगड शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक मारुती नवले यांच्याविरुद्ध मुळशी येथील एका जमिनीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करायला लावून, त्यांना बदनामी करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन एक कोटीची मागणी करुन रोख रक्कम व सोन्याच्या बिस्किटाच्या स्वरुपात तब्बल 40 लाखाची खंडणी घेतल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्हाटेसह दोघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बर्हाटे व त्याच्या साथीदाराविरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे असून बर्हाटेविरुद्ध आणखी गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रविंद्र बर्हाटे व सिद्धार्थ डांगी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी मारूती निवृत्ती नवले (वय 71, रा. एनडीए रस्ता) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बर्हाटे, डांगी, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेझ जमादार, पत्रकार जैन यांच्याविरुद्ध यापूर्वीच कोथरुड, समर्थ, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर जगताप, जैन हे दोघे समर्थ पोलिस ठाण्यात दाखल गुन्हामध्ये अटकेत आहेत. बर्हाटे, जगताप व त्यांच्या साथीदाराविरुद्धची दिवसेंदिवस अनेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. तर बर्हाटे हा फरारी आहे.
नेमके प्रकरण काय?
नवले यांची सिंहगड शैक्षणिक संस्था आहे. नवले यांनी 2012मध्ये मुळशी येथील अंबटवेट येथे असलेल्या पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टबाबत चैनसुख गांधी यांच्यासमवेत मिळकत व शाळेबाबत मतभेद होते. त्याचा गैरफायदा घेऊन बर्हाटे याने चैनसुख गांधी यांना नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांची बदनामी केली. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बर्हाटे हा फिर्यादीच्या एरंडवणे येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात आला. त्याने फिर्यादी यांना "तुम्ही आमच्या परस्पर चैनसुख गांधी यांच्याशी वाद मिटविता काय? मी ही केस मिटु देणार नाही. माझ्याकडे या ट्रस्टची पॉवर ऑफ एटर्नी आहे. तुमची केस मीडियामध्ये लावुन धरेन. केस मिटवायची असेल तर मला एक कोटी रुपये द्या" अशा प्रकारे फिर्यादीकडे खंडणी मागितली.
फिर्यादी यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी बर्हाटे याने फिर्यादीकडे 50 लाख रुपये मागितले. तसेच पैसे न दिल्यास खांडोळी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बर्हाटे पुन्हा फिर्यादीच्या कार्यालयात आला. त्याने फिर्यादीकडे आत्ताच्या आता 50 लाख रुपये द्या, नाही तर खांडोळी करुन जिवे मारण्याची पुन्हा धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी यांनी घाबरुन 20 लाख रुपये रोख व 20 लाख रुपये किंमतीच्या सोन्याची बिस्किटे असे एकुण 40 लाख रुपयाची खंडणी दिली. त्यानंतर बर्हाटे याने फिर्यादी यांना याबाबत कोणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.