गांव दत्तक अभियानांतर्गत अंतरवाली सराटी गाव घेतले दत्तक

गांव दत्तक अभियानांतर्गत  अंतरवाली सराटी गाव घेतले दत्तक
Published on: 

दुष्काळग्रस्तांच्या विकासासाठी
अंतरवाली सराटी दत्तक घेणार

पंकजा मुंडे यांची घोषणा; जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा

जालना ः ‘गाव दत्तक अभियानांतर्गत’ दुष्काळग्रस्त गावांना मदत देण्याच्या उपक्रमाचे कौतुक करत, सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आपण अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेत आहोत. आचारसंहितेनंतर या गावाला भेट देणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पीक पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले.
पालकमंत्री मुंडे जालना दौऱ्यावर होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारीया, महापालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे आदी उपस्थित होते.
या वेळी मुंडे यांनी पीक पंचनामे, जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चाऱ्याची उपलब्धता, रोजगार हमी योजना तसेच शहरी आणि ग्रामीण भागांतील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.
मुंडे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यातील ९५४ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, या गावांतील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. पीकविमा प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना पीकविम्याचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवावे. जलस्रोतांचे पुनर्भरण करावे, तसेच नदी-नाल्यांचे खोलीकरण करावे. पाणीवापरात दहा टक्के कपातीच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळावा,’’ असे निर्देश त्यांनी दिले.
जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा साक्षरता अभियान राबवून मुरघास, हायड्रोपोनिक्स आणि अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे. रोजगार हमी योजनेची कामे जलसंधारणाशी जोडून विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन यांना प्राधान्य द्यावे, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्तांना मदत करताना सीएसआरच्या बरोबरीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानही पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.

जलसंवर्धनाची कामे हाती घ्या
शेतकरी आणि ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत रोजगारनिर्मितीची कामे प्रभावीपणे राबवावीत. जलसंधारण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि विहिरींची दुरुस्ती यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा. यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट, बंधारे आणि नाला खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com