

पान १० - १६ साठी
००००००००००००००००००००००००००००००
जनावरांतील अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स
---------------
रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव ज्या वेळी स्वतःमध्ये अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स निर्माण करतात आणि अशा रोगावर पशुतज्ज्ञांनी केलेले उपचार अपयशी ठरतात. पर्यायाने उपचारावरील खर्च वाढतो, पशूपासून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये घट होते, पशूमध्ये मृत्युदर वाढतो. या अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्सचा मानवामध्ये देखील संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. हे लक्षात घेऊन योग्य उपचार पद्धतीचा अवलंब महत्त्वाचा ठरतो.
------------------
डॉ. सुधीर राजूरकर
---------------------------
आज सर्वत्र अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स बद्दलची चर्चा चालू आहे. सर्व जगाच्या समोर ही एक मोठी समस्या आहे. पशू उपचारासाठी आला, की त्याच्या संसर्गावर प्रतिजैवकाचा वापर केला जातो. परंतु तो संसर्ग आपल्या उपचारास दादच देत नाही. मग यापेक्षा प्रभावी आणि महाग प्रतिजैवकाचा वापर केला आणि काही दिवसातच संसर्ग त्या नवीन प्रतिजैवकाला देखील दाद देत नाही, यालाच अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स असे म्हणतात.
जागतिक आरोग्य संघटनेचे अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स बाबतीत काय निर्देश आहेत या बाबींची माहिती पशुवैद्यकांबरोबरीने पशुपालकाला असणे आवश्यक आहे. अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स विरोधी प्रतिबंधात्मक पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव ज्या वेळी स्वतःमध्ये अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स निर्माण करतात आणि अशा रोगावर पशुतज्ज्ञांनी केलेले उपचार अपयशी ठरतात. पर्यायाने उपचारावरील खर्च वाढतो, पशूपासून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये (दूध/ मांस) घट होते, पशूमध्ये मृत्युदर वाढतो, या अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्सचा मानवामध्ये देखील संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो.
अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स होण्याची कारणे ः
१) पशू उपचारासाठी ज्या वेळेस आपल्याकडे आणला जातो, तेव्हा त्या पशूचा आजार वाढलेला असतो. कारण पशू आजाराच्या लक्षणांकडे सुरुवातीस दुर्लक्ष केले जाते, आजाराची, उपचाराची योग्य माहिती नसताना पशुपालक स्वतः त्यावर उपचार करतो.
२) प्रतिजैवकाचा अयोग्य वापर केला जातो. काही आजारांमध्ये आवश्यकता नसताना प्रतिजैवकाचा वापर केला जातो.
३) आपण उपचार करत असलेल्या आजारावर विशिष्ट प्रकारातील प्रतिजैवक चालतात. परंतु त्या प्रकारातील प्रतिजैवक न वापरता आपण अयोग्य प्रतिजैवक वापरले तर त्याचा गुण येत नाही.
४) चुकीचा डोस (कमी किंवा जास्त) दिल्याने उपचारावर परिणाम होतो.
५) पशूला थोडे बरे वाटले तर उपचाराची गरज नाही असे समजून उपचार बंद केला जातो. यामुळे अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स वाढण्याची शक्यता असते.
६) पशुपालनामधील चुकीच्या पद्धती ः
- गोठ्यात अस्वच्छता, गर्दी.
- पोषक आणि संतुलित खाद्याचा अभाव.
- पशूच्या शरीर वाढीसाठी प्रतिजैवकाचा वापर.
७) पशूच्या वाढीसाठी त्यांच्या खाद्यामध्ये कमी मात्रेमध्ये प्रतिजैवकाचा वापर होतो. यामुळे पशूच्या ‘एफसीआर’मध्ये वाढ होते. ही प्रतिजैवके खाद्यातून नियमित देत असल्यामुळे पशूमध्ये रोग प्रतिबंध होतो. सब क्लिनिकल स्वरूपातील संसर्ग रोखले जातात. परंतु यातून अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्सदेखील निर्माण होतो. यामुळेच प्रतिजैवकाच्या वापरावर निर्बंध आले.
अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना ः
१. जागरूकता वाढवणे ः
- शेतकरी, पशुवैद्यक, डॉक्टर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्सबद्दल माहिती देणे
- योग्य प्रतिजैवकाच्या वापराचे शिक्षण देणे.
२. निरीक्षण आणि संशोधन ः
- अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स बद्दल तांत्रिक माहिती गोळा करणे.
- नवीन औषधे, पर्यायी उपचार (आयुर्वेदिक, लसीकरण) विकसित करणे.
३. संसर्ग प्रतिबंध ः
- स्वच्छता सुधारणा.
- योग्य वेळी शिफारशीत लसीकरण.
- गोठ्यामध्ये जैव सुरक्षा उपाययोजना.
४. अँटिमायक्रोबियल्सचा योग्य वापर ः
- आवश्यक तेव्हा प्रतिजैवकाचा वापर.
- योग्य मात्रा, कालावधी आणि औषधांची निवड.
- पशुवैद्यकाद्वारेच प्रतिजैवकाचा वापर.
५. गुंतवणूक आणि सहकार्य ः
- नवीन औषध, रोग निदान आणि लसीसाठी गुंतवणूक.
- शासन, खासगी संस्था, पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य.
--------------------
इन्फो ः
प्राण्यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे ः
१. पशू शरीर वाढीसाठी प्रतिजैवकाचा वापर टाळा. प्रतिजैवकाचा वापर फक्त उपचारासाठी करावा, शरीर वाढीसाठी नाही.
२. प्रयोग शाळेतील परीक्षणावर आधारित उपचार करावेत. रोगाचे कारण ओळखून विशिष्ट उपचार पद्धती वापरावी.
३. पशुवैद्यकाच्या द्वारे किंवा त्यांच्या देखरेखीमध्ये उपचार आवश्यक आहेत. स्वतःच्या मनाने उपचार करू नयेत.
४. औषधी शरीरातून पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत योग्य कालावधी पाळणे महत्त्वाचे ठरते. दूध/ मांस यात औषधाचे अंश टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.
५. स्वच्छता, जैव सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. संक्रमण कमी करण्यासाठी गोठ्याची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
६. लसीकरणावर भर द्यावा. आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार महत्त्वाचे ठरतात. प्रतिजैवकावरील अवलंबित्व कमी करावे.
--------------
इन्फो ः
अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स नियंत्रणासाठी पर्याय :
आज मानवाच्या आजारावरील उपचार असो अथवा पशुधनावरील उपचार अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स टाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपण योग्य वेळी योग्य ते व योग्य मात्रेतच प्रतिजैवक वापरणार असलो तरीही काही प्रकारातील औषधी ज्या आपण वापरत असलेल्या प्रतिजैवकाची परिणामकारकता वाढवतात अशा औषधींचा वापर हा अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स कमी करण्यासाठी आवश्यक ठरतो.
१. औषधी वनस्पतीचा वापर ः लसूण,कडूलिंब, ओरेगानो तेल.
२. प्रोबायोटिक्स / प्रीबायोटिक्स ः लॅक्टोबेसिलस, यीस्ट
३. ऑर्गेनिक ॲसिड्स ः बुटिरिक आम्ल, प्रोपिओनिक आम्ल
४. एन्झाइम्स ः फायटेज, प्रोटियेज
५. खनिज द्रव्याचा वापर ः झींक, तांबे, चांदी, सेलेनियम, मॅग्नोशिअमचा वापर.
आवश्यकता नसेल तेथे प्रतिजैवकाचा वापर टाळून अथवा प्रतिजैवकाची मात्रा कमी करण्यासाठी या औषधीचा उपयोग करता येतो. प्रतिजैवकांसोबतच या प्रकारातील औषधींचा वापर केल्यास आपण वापरत असणाऱ्या प्रतिजैवकाची परिणामकारकता वाढते.
--------------------------------------------
इन्फो ः
औषधी वनस्पती, खनिज द्रव्यांचा वापर ः
आज बाजारपेठेत उपलब्ध असलेली चांगली प्रतिजैवके उपचारास मात्र कुचकामी ठरत आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे सूक्ष्मजीवांमध्ये तयार होत असलेली प्रतिजैवक विरोधी क्षमता. यामुळे पशु उपचारामध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रतिजैवकांचा योग्य वापरासोबतच या प्रतिजैवकांची जिवाणूविरोधी शक्ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पती, खनिज द्रव्यांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. यासाठी मिरी, पिंपळी, हळद, ज्येष्ठमध, आले, लसूण, कडुलिंब यांचा वापर उपयुक्त ठरतो. यासोबतच झिंक, तांबे, रजत, लोह, सेलेनियम, मॅग्नेशिअम अशी खनिजद्रव्ये प्रतिजैवकांच्या सोबत वापरली तर प्रतिजैवकांची सूक्ष्मजीव विरोधी कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. पर्यायाने या प्रतिजैवकांचा आवश्यक तेवढा वापर आपण करू शकतो.
वनस्पती आणि खनिजद्रव्यांचे कार्य ः
१) ज्या वेळेस आपण ही प्रतिजैवके घेतो किंवा पशूला देतो तेव्हा त्यावर शरीरात काही क्रिया होतात. यामुळे या प्रतिजैवकांचे विघटन होते, अशा क्रियांवर इथे नियमन नियंत्रण होते. पर्यायाने प्रतिजैवकांची उपलब्धता जास्तीत जास्त प्रमाणात होते.
२) रोगकारक जिवाणू हे त्यांच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैवकांचे अंश त्यांच्या शरीरातून बाहेर टाकतात. या क्रियेच्या विरोधात औषधी वनस्पतीतील घटक जिवाणूंच्या शरीरातच राहून जिवाणूंना मारतात.
३) औषधी वनस्पतींमध्ये स्वतःचे असे सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म असतात. पर्यायाने या स्वतः आणि सोबत प्रतिजैवकांच्या वापर यामुळे जास्त क्षमतेने जिवाणूविरोधी कार्य करतात. औषधी वनस्पती पशूच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास उपयुक्त आहेत.
४) औषधी वनस्पती आणि खनिज द्रव्यांचा वापर केल्यास आपण वापरत असलेल्या प्रतिजैवकाची मात्रा, वापराचा कालावधी कमी करता येतो. प्रतिजैवकांचा पूर्ण उपयोग झाल्यामुळे या औषधींचे अंश प्राणी उत्पादनात अत्यंत कमी कालावधीसाठी रहातात. हे सर्व औषधीद्रव्य नैसर्गिक स्वरूपात असल्यामुळे त्यांच्या वापराचे दुष्परिणाम आढळत नाहीत.
------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३
(निवृत्त सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.