काशीळ तडीपाराच्या यादीत अपशिंगे (मि) गावाचा उल्लेखामुळे ग्रामस्थ आक्रमक

काशीळ तडीपाराच्या यादीत अपशिंगे (मि) गावाचा उल्लेखामुळे ग्रामस्थ आक्रमक

Published on

अपशिंगे मिलिटरीचे ग्रामस्थ आक्रमक

तडीपाराच्या यादीत गावाच्या वारंवार उल्लेखामुळे आंदोलनाचा इशारा

काशीळ, ता. २४ : बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार केलेल्या व्यक्तींच्या यादीत हरिदास राठोड या नावामागे वारंवार अपशिंगे (मिलिटरी) गावाचे नाव नमूद केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गावाच्या प्रतिमेला बाधा निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायतीसह पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली असून, ग्रामपंचायत प्रशासनाने सात दिवसांत ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
नुकत्यात झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा फेब्रुवारीला पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात २५ तडीपार व्यक्तींच्या यादीत संबंधित व्यक्तीच्या नावाचा समावेश आहे. मात्र, या नावापुढे अपशिंगे (मि.) गावाचा उल्लेख केल्याने संपूर्ण गावाची बदनामी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीचा मूळ रहिवास व त्याच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अपशिंगे (मि.) हे गाव देशसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या सुजाण नागरिकांच्या या गावाचे नाव गुन्हेगारीसंदर्भात जोडले जाणे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने या विषयावर तत्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सात दिवसांत प्रशासनाकडून योग्य निर्णय झाला नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन छेडले जाईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर ६१० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन दिले. या प्रकरणात योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने यावेळी दिले.
-------------------------
01647
बोरगाव ः प्रशांत हुले यांना निवेदन देताना अपशिंगे (मि.) गावचे ग्रामस्थ.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com