हिवताप प्रतिबंधासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maleria

पावसाळ्यात हिवतापासारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो. हिवताप हा आजार डासांपासून होत असतो.

हिवताप प्रतिबंधासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

पुणे - पावसाळ्यात हिवतापासारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो. हिवताप हा आजार डासांपासून होत असतो. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली जाते. या अभियानांतर्गत आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी केली जातात. ही भांडी घासून-पुसून कोरडी केली जातात आणि घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवण्याचे आवाहन केले जाते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘दरवर्षी जून महिन्यात पाऊस कधी कमी, तर कधी जास्त प्रमाणात पडत असतो. यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. या डासांमुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उदभवत असतात. या जलजन्य आणि किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपापले घर आणि घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे, किटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे असते. डेंगी व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास हे घरातील मनिप्लांट, फ्रिज, कुलर, जमिनीतील पाण्याची टाकी, प्लास्टिकच्या टाक्या, घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर, प्लास्टिक कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालत असतात. याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या जोडीला लोकसहभाग महत्त्वाचा असतो.’’

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

  • डासांपासून संरक्षणासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

  • घर, घराच्या परिसरात नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचू देऊ नका.

  • डासांना घरात येण्यास रोखण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.

  • घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करा.

  • घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवा.

  • ताप येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा त्वरित सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करा.

  • अंगावर ताप काढू नका.

पावसाळ्यात जिल्ह्यातील कोणत्याही गावात किंवा वाडी-वस्तीवर साथीचे रोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता आरोग्य विभागाच्यावतीने आतापासूनच घेण्यात येत आहे. यासाठी गावा-गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, हातपंप, हॉटेल, टँकरची स्वच्छता नियमितपणे केली जाणार आहे. शिवाय पाण्याचे शुद्धीकरण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, धूरफवारणी करणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Web Title: Appeal Citizens In District To Observe Dry Day One Day In A Week For Prevention Of Malaria

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneAppealMalariadry day
go to top