
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी "भारत संघर्ष यात्रा" शिक्षक संघाचे यात्रेत सहभाग घेण्याचे आवाहन
जुन्नर : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची "भारत संघर्ष यात्रा" महाराष्ट्रात मंगळवार ता.२६ सप्टेबर रोजी येणार असून सातारा ते पंढरपूर येथे सर्वच कर्मचारी संघटनांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे व सरचिटणीस सुरेशभाऊ थोरात यांनी केले आहे.
या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार असून जनजागृतीसाठी बाईक रँली, सभा, मेळावे यांचे आयोजन करण्यात आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे हा २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा व महत्वाचा विषय असून शिक्षण क्षेत्रातील इतरही महत्वपूर्ण मागण्या संदर्भात समाज व शासन यांचे लक्ष वेधण्याचे काम यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे मोहरे यांनी सांगितले.
शिक्षण सेवक योजना बंद करून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी. नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी बाबी काढून टाकण्यात याव्या.सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन "समान काम समान वेतन " सुत्र अवलंबविण्यात यावे.शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेवून "आम्हाला फक्त शिकवू द्या".शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटीकरण करण्यात येवू नये प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
देशाच्या चार सीमावरुन निघणाऱ्या यात्रांचा समारोप सर्व राज्यात जनजागृती करत ता. ५ आँक्टोंबर रोजी नवीदिल्ली येथे होणार आहे. दोन यात्रा महाराष्ट्रातून जाणार आहेत. गुजरातहुन निघणारी यात्रा २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात नवापूर येथे प्रवेश करणार असून नंदुरबार धुळे ,जळगाव मार्गे मध्यप्रदेश जाईल. कन्याकुमारीहुन निघणारी यात्रा गोवा मार्गाने सिंधुदुर्ग येथे २४ सप्टेंबरला प्रवेश करुन कोल्हापूर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वाशिम, अमरावती, नागपूर मार्गे मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे.