शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  आजपासून ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आठ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून (ता. ३०) तीन ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. राज्यात आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील.

पुणे - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आठ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून (ता. ३०) तीन ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. राज्यात आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. तसेच खुल्या गटातील विद्यार्थी सातवीमध्ये ५५ टक्के, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थी ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी  पात्र आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेत असलेल्या या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर असतील. प्रत्येक पेपर ९० गुणांचा असून, त्यात ९० प्रश्‍न असतील. बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यात कार्यकारण भाव, विश्‍लेषण, संकलन आदी संकल्पनांवर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ  प्रश्‍न असतील.

शालेय क्षमता चाचणीमध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित यावर प्रश्‍न विचारले जातील. प्रश्‍नपत्रिका या मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड आणि तेलुगू या आठ माध्यमांतून दिल्या जाणार आहेत. प्रादेशिक भाषांमधील प्रश्‍नपत्रिकेबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्‍नपत्रिकाही  एकत्रित दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आठपैकी एकच माध्यम घेता येईल.

अखिल भारतीय स्तरावर या शिष्यवृत्तींची संख्या एक लाख आहे. त्यापैकी महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
- तुकाराम सुपे, सचिव, राज्य परीक्षा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apply online for the scholarship exam from today