पोलीस उपायुक्तांच्या नेमणूका; गुन्हे शाखेत अमोल झेंडे, तर वाहतुक शाखेत विजय मगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Police

नव्याने नियुक्ती झालेल्या अद्यापपर्यंत पदस्थापना रखडलेल्या पोलिस उपायुक्तांना अखेर विविध परिमंडळ व विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली.

पोलीस उपायुक्तांच्या नेमणूका; गुन्हे शाखेत अमोल झेंडे, तर वाहतुक शाखेत विजय मगर

पुणे - नव्याने नियुक्ती झालेल्या अद्यापपर्यंत पदस्थापना रखडलेल्या पोलिस उपायुक्तांना अखेर विविध परिमंडळ व विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी अमोल झेंडे, वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी विजय मगर यांची तर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तपदी संदिपसिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह सात जणांची विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालयातुनच थेट पदस्थापनेचे आदेश घेऊन शहर पोलिस दलात दाखल होत महत्वाच्या विभागांमध्ये नियुक्ती करण्याचा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला यावेळी चाप लागला. त्याचा सर्वाधिक फटका शहरातील वाहतुकीला बसल्याचे चित्र मागील वर्षभरापासून दिसून येत होते. त्याचबरोबर अन्य विभागांमध्येही थेट पदस्थापना घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांमुळे संबंधित विभागांना फटका बसण्याबरोबरच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही अक्षरशः कुचंबना झाल्याची स्थिती होती.

मात्र नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये थेट पदस्थापनेला आळा बसल्याचे चित्र होते. शहरात नव्याने बदलून आलेल्या कुठल्याही पोलिस उपायुक्तांना थेट पदस्थापना न देता शहर पोलिस दलात नियुक्ती झाल्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शहर पोलिस दलात दाखल होऊनही नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली नव्हती. अखेर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी (ता.15) पुणे पोलीस आयुक्तालयात नव्याने बदलून आलेल्या 7 पोलीस उपायुक्तांची विविध ठिकाणी नेमणूक केली. तर दोन पोलिस उपायुक्तांची अंतर्गत बदली केली.

संदिपसिंह गिल यांना परिमंडळ एकची जबाबदारी देण्यात आली आहे. तर परिमंडळ दोनसाठी स्मार्तना पाटील यांची, तर परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तपदी सुहेल शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. शशिकांत बोराटे यांची परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तपदी तर, विक्रांत देशमुख यांची परिमंडळ 5 च्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस दलात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेची जबाबदारी अमोल झेंडे यांच्यावर, तर वाहतुक शाखेची जबाबदारी विजय मगर यांना देण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पदी बदली करण्यात आली. तर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांची मुख्यालयात पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.