
एआरएआयने विकसित केले इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर
पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक असलेले स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्ड, कॅडेमो (CHAdeMO), सीसीएस (कंबाईन्ड चार्जिंग सिस्टिम्स) यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करणे शक्य होणार असून ते स्थानिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर सध्या आयात करण्यात येत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत एआरएआयने लाइट ईव्ही एसी चार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे, अशी माहिती ‘एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी मंगळवारी दिली. एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी ००१ या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून या आधी एका खासगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे, असे उपसंचालक आनंद देशपांडे यांनी सांगितले.
हेही वाचा: टीईटी परीक्षा पुढे ढकलली; 31 ऑक्टोबरला होणार परीक्षा
र्इव्हीसाठी कौशल्य विकास केंद्र
येत्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता एआरएआयच्या वतीने कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. केरळ व तेलंगण येथील राज्य सरकारांशी याविषयीची प्राथमिक चर्चा सुरू आहे. अभ्यासक्रमाची काही ई मोड्यूल्स आणि लॅब यांचाही यामध्ये समावेश आहे, असे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे यांनी सांगितले.
चार्जरचे वैशिष्ट्ये...
एसी ००१ चार्जर हा एसी चार्जर असून चार चाकी गाड्यांसाठी त्याचा वापर करणे शक्य
चार्जर सिंगल फेज असून त्याची बॅटरी २३० व्होल्ट १५ अॅम्पिअर इतक्या क्षमतेची
चार्जर वापरल्यानंतर किती वीज वापरली गेली, वाहन किती चार्ज झाले हे कळू शकणार
घरांबरोबरच महामार्गावर देखील वाहन चार्ज करणे शक्य होईल
सध्याची किंमत ५० ते ६० हजार रुपये
भविष्यात टाइप २ प्रकारातील हाय
पॉवर चार्जर्स सोबतच दुचाकी वाहनांसाठी चार्जर निर्मिती करण्याचा विचार
पुण्याजवळील ताकवे या ठिकाणी एआरएआयच्या वतीने नव्या मोबिलिटी रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार असून येत्या चार ते पाच वर्षांत विविध टप्प्यांत ते कार्यान्वित होईल. या सेंटरसाठी विविध टप्प्यांत एकूण ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
- डॉ. रेजी मथाई, संचालक, एआरएआय
Web Title: Arai Electric Charger
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..