असा आहे पुण्यातील खडतर प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University Chowk Accident

पुण्यात सुमारे ३० लाख वाहने आहेत. सक्षम सार्वजनिक वाहतुकीची सेवा नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या शहरात वाढत आहे. त्यातच असलेले रस्ते पुरेसे रुंद नसल्यामुळे दुचाकी वाहनांचा वापर वाढता आहे.

असा आहे पुण्यातील खडतर प्रवास

पुण्यात (Pune) सुमारे ३० लाख वाहने (Vehicle) आहेत. सक्षम सार्वजनिक वाहतुकीची सेवा (Transport Service) नसल्यामुळे खासगी वाहनांची (Private Vehicle) संख्या शहरात वाढत आहे. त्यातच असलेले रस्ते पुरेसे रुंद नसल्यामुळे दुचाकी वाहनांचा (Two Wheeler) वापर वाढता आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची (Road) अवस्था चांगली असणे गरजेचे आहे. परंतु, शहरातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेतला तर खड्डे, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि पोलिसांच्या (Police) पुरेशा नियमनाचा (Rules) अभाव दिसून येतो. ‘सकाळ’च्या बातमीदारांनी (Sakal Reporter) संबंधित रस्ता ते शनिवारवाडा दरम्यान दुचाकीवरून शुक्रवारी ११ वाजता प्रत्यक्ष प्रवास (Journey) केला व समस्या (Problems) अनुभवल्या. डोक्यावरून चकचकीत मेट्रो धावत असताना पायाखालचे रस्तेही नागरिकांना किमान सुरक्षित वाटले पाहिजेत, याची जबाबदारी महापालिकेची आहे.

सातारा रस्ता : बेशिस्त वाहतूक, धुळीचे लोट

पुणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सातारा रस्त्यावरील वाहनचालकांना बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणे, धुळीचे लोट आदी अडथळ्यांची शर्यत पार करीतच जावे लागते. ८.४ किलोमीटरच्या अंतरासाठी किमान १२ वाहतूक नियंत्रक दिवे वाहनचालकांना पार करावे लागतात. त्यामुळे दुचाकीवरील प्रवासासाठी किमान ३० मिनिटे लागतात. गर्दीच्या वेळेत तर हा वेळ आणखी वाढतो.

कात्रज चौक ते शनिवारवाड्यादरम्यान प्रवास करताना वाहनचालकांना कात्रज चौक, कात्रज डेअरी, चव्हाणनगर, बिबवेवाडी कॉर्नर, वाळवेकरनगर, प्रेमनगर, भापकर पेट्रोल पंप, पंचमी चौक, अभिनव कॉलेज, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक येथील वाहतूक नियंत्रक दिवे पार करावे लागतात. या रस्त्यावर बालाजीनगर, स्वारगेट येथे उड्डाण पूल आहेत तर, प्रेमनगर, साईबाबा मंदिराजवळ भुयारी मार्ग आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. दोन्ही उड्डाण पुलावर वाहने भरधाव असतात. साईबाबा मंदिरापासून उड्डाण पुलावरून गेल्यास स्वारगेट चौक लवकर पार होतो. जर पुलाखालून गेल्यास स्वारगेट चौकातील वाहतूक नियंत्रक दिवा आणि बेशिस्त रिक्षाचालकांमुळे निर्माण झालेल्या कोंडीला सामोरे जावे लागते. नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर दुरुस्तीदरम्यान निर्माण झालेले उंचवटे वाहनचालकांना हादरेच देतात. गरवारे बाल भवन, तसेच बाजीराव रस्त्यावर सुरू असलेल्या खोदकामामुळे, अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा वेग सध्या मंदावला आहे. त्यातच शनिपाराजवळही खोदकाम सुरू आहे. त्यामुळे परिसरात वाहनांचे धूर आणि धुळीचे लोट दिसतात. अप्पा बळवंत चौकाच्या पुढे शनिवारवाड्यादरम्यान दुतर्फा उभ्या बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांमुळे प्रभात टॉकीज आणि फुटका बुरूज चौकात कोंडी होते. तसेच या परिसरात रस्ता दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्यामुळे वाहनांचा प्रवास अडखळत होतो. फुटका बुरूज चौकातही होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

या रस्त्यावर पीएमपीच्या बसची मोठी वर्दळ होते. अनेकदा बस एकामागोमाग न जाता डाव्या-उजव्या बाजूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही वाहतुकीचा वेग मंदावतो. शनिवारवाड्याभोवतीही अनेकदा बेकायदा पार्किंग होते. त्यावर वाहतूक पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे शिवाजी रस्त्यावरही कोंडी होते.

आवश्यक उपाययोजना

 • बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून नियमितपणे कारवाई

 • वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांकडून नियमन

 • अप्पा बळवंत चौक ते फुटका बुरूज दरम्यान वाहतूक पोलिस गरजेचे

 • रस्ते समतोल आवश्यक

सिंहगड रस्ता : रोजच होते तारेवरची कसरत

समान पाणीपुरवठा, उड्डाणपुलाच्या कामासाठी केलेले बॅरिकेडिंग, उडणारी धूळ, रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे) रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची खडतर कसरत सुरू आहे. दुचाकी घसरण्याचे प्रमाणही यामुळे वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन धायरी फाटा ते शनिवारवाडा अंतरासाठी गर्दीच्या वेळेत ३३ ते ३४ मिनिटे लागत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फनटाईम थिएटर असा उड्डाणपूल उभारला जाणार आहे, पण कामाचा वेग बघता तीन वर्षापेक्षा जास्त या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा समाना करावा लागणार आहे. हे काम सुरू होताना सिंहगड रस्त्यावरील पर्यायी मार्ग, मुख्य रस्त्याचे रुंदीकरण, अतिक्रमण काढणे याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

‘सकाळ’च्या बातमीदाराने सकाळी ११.२९ला धायरी फाटा येथून दुचाकीवरून प्रवास सुरू केला. शनिवारवाडा गाठण्यासाठी १२.३ वाजले. या ११ किलोमीटरच्या अंतरासाठी ३४ मिनिटे लागले.

धायरी फाटा येथे बेशिस्तपणे उभे असलेले ऑटोरिक्षा, उड्डाणपूलावरून खाली येणारे भरधाव डंपर व इतर वाहने, चौकातील अतिक्रमण यामुळे हा चौक धोकादायक झाला आहे. तसेच राँग साइडने येणारे कारचालक, दुचाकींचे प्रमाण मोठे आहे, तेथे वाहतूक पोलिस नसल्याने या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मोकळे रान मिळाले आहे.

वडगाव पुलाखाली वाहतूक पोलिस असेल तरी त्यांचा जोर हा पावती फोडण्यावर असतो. गोलयगंगा पासून उड्डाणपूलाचे काम सुरू झाले आहे. स्वारगेटकडे जाताना डाव्या बाजूने पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक काढून टाकून रस्ता मोठा करण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. रस्त्यावर पडलेली माती, खडी यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे. याकडे संबंधित ठेकेदार व प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र याचा त्रास दुचाकीस्वारांना होत आहे.

ब्रह्मा व्हेज येथील रावसाहेब ऊर्फ अप्पासाहेब मोरे पाटील चौकात उड्डाणपूलाच्या पिलरचे काम सुरू झाले आहे. पण त्याचवेळी या चौकात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, ड्रेनेजचे चेंबर अनेक ठिकाणी खचल्याने दुचाकीस्वारांच्या कंबरेला धक्के बसत आहेत. पण तरीही दुरुस्ती केली जात नाही. याच चौकात सिमेंटचा रस्ता खोदून समानपाणी पुरवठ्याचे काम सुरू आहे. जेसीबीच्या साह्याने धोकादायक पद्धतीने पाइप ओढत नेले जात आहेत.

माणिकबाग ते हिंगणे दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आहे. पार्किंगही चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. यादरम्यान पादचारी मार्ग काढून रस्ता मोठा केला जात असला तरी अतिक्रमण कायम आहे. हिंगणे ते दांडेकर पूल यादरम्यान दत्तवाडी, दांडेकर पूल येथे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते, दांडेकर पूलाच्या परिसरात अतिक्रमण थेट रस्त्यावर आले तरी कारवाई केली जात नाही.

दांडेकर पूल ते सारसबाग दरम्यान अनेक ठिकाणी डांबर वितळून रस्त्याची लेव्हल बिघडली आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे. सारसबाग ते शनिवारवाडा हा दरम्यान बाजीराव रस्त्यावर अजूनही पाणी पुरवठ्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

सतरा गतिरोधक

धायरी फाटा ते शनिवारवाडा या ११ किलोमीटरच्या रस्त्यावर १७ गतीरोधक आहेत. या गतीरोधकांवरही खड्डे पडले आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत आहे.

आवश्यक उपाययोजना

 • रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकावीत

 • माती-खडी काढून धोका कमी करावा

 • गतिरोधकांची रचना शास्त्रीय पद्धतीने करावी व सुस्थितीत असावेत

 • चौकामधील खड्डे बुजवावेत, चेंबर लेव्हल करावेत

औंध रस्ता : नशिबी हालच

ठिकठिकाणी अरुंद रस्ता, मेट्रो, उड्डाणपूल, रस्त्यांची सुरू असलेली कामे, तुटलेल्या चेंबरची झाकणे अन्‌ उचकटलेल्या सिमेंट ब्लॉकवरून कशीबशी वाट काढीत वाहतूक कोंडीतून सुटका करीत दुचाकीस्वार आपला मार्ग मोकळा करतात. विशेषतः बऱ्याच ठिकाणी बस, ट्रक, टेंपो अशा मोठ्या वाहनांजवळून जाताना दररोजच मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ दुचाकीस्वारांवर येत असल्याचे चित्र औंध (राजीव गांधी पूल) ते शनिवारवाडा या रस्त्यावर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरीही कॉसमॉस बॅंक ते खैरेवाडीपर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा खडतर प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे दिसून येत आहे.

औंध ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यानचा ‘औंध राजभवन स्मार्ट सिटी मार्ग’ या मार्गावरून दोन्ही शहरांमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने नोकरदार, व्यावसायिक ये-जा करत असून त्यात दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. परंतु, याच दुचाकीस्वारांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. औंध बसस्थानकापासून उजवीकडे औंध स्मशानभूमीकडे वळताना व याच मार्गावरून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे जकात नाक्‍याजवळ वाहतूक कोंडी होत आहे. तर श्री. शिवाजी विद्यामंदिराजवळील घरे व विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालयामुळे रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत आहे. ब्रेमेन चौकात वाहतूक पोलिस, वॉर्डन दिसत असले तरीही ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे अशा प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे पोलिसांसमोरच उल्लंघन होऊनही पोलिस कोपऱ्यात थांबून कारवाई करीत असल्याचे दिसते.

ब्रेमेन चौक ते चतुःशृंगी पोलिस ठाण्यापर्यंत दुचाकीस्वारांसाठी रस्ता चांगला असला तरी तेथूनच वाहतूक कोंडी सुरू होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला दुचाकीस्वारांची गर्दी होत असल्याने दुचाकीस्वार अक्षरशः दुचाकीस्वार थेट सायकल ट्रॅक, पदपथावरून वाहने दामटत आहेत. अनेकदा अपघाताच्या घटनाही घडतात. राजभवनसमोरून विद्यापीठाकडे वळणारी वाहने आणि तेथेच अचानक तयार केलेल्या मोठ्या गतिरोधकामुळे वाहतूक कोंडी होत आहे. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फुटली, तरी तेच चित्र आता कॉसमॉस बॅंक ते खैरेवाडीपर्यंत दिसते व्हॅमनीकॉम संस्था ते खैरेवाडीपर्यंत रस्त्याच्याकडेला अर्धवट खोदकाम केले आहे. त्याभोवतीचे बॅरीकेडस, लोखंडी चेंबरची उचकटलेली झाकणे, फुटलेले सिमेंट ब्लॉक, सिमेंटच्या रस्त्यांच्याकडा यातून दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन दुचाकी चालवावी लागते. त्यातच मेट्रो, उड्डाणपुलाच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडीमध्ये जात आहे. खैरेवाडी ते शनिवारवाडापर्यंत बऱ्यापैकी चांगले रस्ते, काही प्रमाणात सुरळीत वाहतुकीमुळे दुचाकीस्वार सुटकेचा निःश्‍वास टाकत आहेत.

विद्यार्थी, पादचाऱ्यांचा विसर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लॉयला, मॉडर्न हायस्कूल, महाविद्यालये, अन्य शाळा, विद्यालये व शैक्षणिक संस्था विद्यापीठ चौकाच्या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पादचारी यांचा वावर जास्त असूनही त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असूनही पोलिस, महापालिका प्रशासनाला त्यांचा विसर पडल्याची सद्यःस्थिती आहे.

आवश्यक उपाययोजना

 • खराब रस्ते दुरुस्त करण्याची गरज

 • लोखंडी व सिमेंटच्या चेंबरची झाकणे, सिमेंटचे ब्लॉक बदलावेत

 • पदपथावरून दुचाकी जाण्याचे टाळण्यासाठी बोलार्डस्‌मधील रुंदी कमी करावी

वाघोली रस्ता : अनधिकृत पार्किंग

रस्त्यातच उभ्या असलेल्या सहा आसनी रिक्षा, रस्‍त्याची अपूर्ण कामे, बेकायदा पार्किंग केलेली वाहने, जड वाहनांची संथ गती, रस्त्याच्या मध्येच सांडलेले काँक्रिट, अचानक गल्ली-बोळातून बाहेर निघणारी जड वाहने, डोळ्यात जाणारी धूळ, रस्त्यात असलेले १८ सिग्नल... एवढी कसरत करून तब्बल एक तास चार मिनिटांनी दुचाकीस्वाराचा वाघोली ते शनिवारवाडा प्रवास पूर्ण होतो.

सकाळी १०.४५ वाजता वाघोतील बस स्थानक ते शनिवार वाडा असा दुचाकीने ३५ ते ४० किमी वेगाने प्रवास केला. एकूण १७ किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल एक तास चार मिनिटांचा वेळ लागत असल्याचे पाहणीत दिसून आले. वाहतूक कोंडी आणि जड वाहनांची मोठी संख्या यामुळे नगर महामार्गावर वाहतूक सकाळच्या वेळेत संथ गतीने होत असल्याचे दिसून आले.

वाघोलीमध्ये बस स्थानकापासून निघताच दोन चौक लागतात. या दरम्यान सहा आसनी रिक्षा चालक आणि इतर वाहने रस्त्यातच उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाघोलीतून निघतानाच किमान पाच ते १० मिनिटांचा वेळ लागतो. गर्दीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकी चालकाला चांगलीच कसरत करावी लागते.

काही दिवसांपूर्वीच नवीन रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे. वाघोली परिसरात खाणी, खडी, डांबर तसेच इमारतींचे साहित्याचे मोठे प्लांट आहेत. तसेच या भागात बांधकामे सुरू आहेत. मोठे गोदाम, शोरूम ही आहेत. परिणामी बहुतांशी मार्गावर जड वाहनांची चांगलीच वर्दळ दिसून येते. गोदामामधून बाहेर येताना गल्ली बोळातून अचानक मोठ्या गाड्या बाहेर येत असल्याचे दिसून आले. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकी चालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. अशी परिस्थिती वाघोली ते आपले घर सोसायटी बस थांब्यापर्यंत दिसून येते.

आपले घर सोसायटी, खराडी बायपास ते येरवडा पर्यत बीआरटी मार्ग आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद होत झालेले दिसून आले. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. येरवड्यातून बंडगार्डन मार्गे येतानाही प्रवास हा धिम्या गतीनेच करावा लागतो. वाघोली ते शनिवारवाडा असा प्रवास करताना एकूण १८ सिग्नल पार करावे लागतात. काही एक-दोन सिग्नल सोडता, वाहतूक पोलिस असल्याचे दिसून आले.

आवश्यक उपाययोजना

 • बेकायदा पार्किंगवर आळा घालावा

 • रस्त्यावरील फळ विक्रेत्यांवर नियंत्रण

 • बीआरटीचा अडथळा दूर करणे

 • जड वाहने जाण्यासाठी लेन ठरवावी

 • उलट दिशेने जाणाऱ्या वाहनांवर आळा घालणे

पौड रस्ता : चालकांच्या नाकीनऊ

शहराचे पश्‍चिमेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या चांदणी चौकातूनच (एनडीए चौक) शहरात प्रवेश करताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत आहे. तेथून शहराच्या मध्यवस्तीतील शनिवारवाडा परिसरात पोचण्यासाठी तब्बल १८ वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. त्यातच मेट्रोच्या कामांमुळे अरुंद झालेले रस्ते, पौड फाटा येथून थेट नळ स्टॉपर्यंतची वाहतूक बंद केल्याने एसएनडीटीमार्गे वळसा घालावा लागत असल्याचाही फटका बसत आहे.

त्यामुळे नऊ किलोमीटरच्या या प्रवासासाठी सध्या जास्तीचे १५ ते २० मिनीटे खर्च करावी लागत आहेत. एनडीए चौकापासूनच चालकांची परीक्षा सुरू होते. येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे भूगाव परिसरातील प्रवाशांना वळसा घालून महामार्गावर उतरावे लागत आहे. तसेच, बावधन परिसरातून येणाऱ्या वाहनांनाही महामार्गावर येऊनच कोथरूडचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र, त्यासाठी महामार्गावर येताना मुंबईकडून आलेल्या भरधाव वाहनांपासून सावध राहावे लागत आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. महामार्ग सोडून कोथरूडकडे जाताना लगेचच येथे तीव्र उतार आहे. तो धोकादायक आहे. तसेच, हा उतार संपल्यानंतर लगेचच मुळशीकडे जाण्याचा रस्ता आहे. मुंबईकडून येणारी अवजड वाहने, टॅंकर व सिमेंट मिक्सरची वाहने या दिशेने जाताना त्यांना इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यावे लागते. त्यामुळे कोंडी होते. तसेच, या तीव्र उताराच्या एकेरी मार्गावर उलट दिशेने काही वाहने महामार्गाकडे येतात. त्यामुळे येथे वेगावर नियंत्रण ठेवावेच लागते.

हा उतार संपल्यानंतर थोड्याच अंतरावर पहिला वाहतूक नियंत्रक दिवा आहे. तेथून पुढे शनिवारवाड्यापर्यंत सुमारे १८ वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. कोथरूड डेपो चौकात असलेल्या खाद्य विक्रीच्या दुकानांनी अतिक्रमण करून पदपथ गायब केले आहेत. पुढे वनाज येथील सीएनजी पंपाकडे उलट दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा कोंडी होते. तसेच, वनाज येथील मेट्रो स्टेशनच्या कामामुळे सह्याद्री रुग्णालयाजवळ रस्ता अरुंद झाला असून, उखडलेलाही आहे. येथे बस आल्यास इतर वाहने अक्षरशः थांबतात. येथून लगेचच पुढे गुजरात कॉलनी चौकात रस्त्याकडेला दुचाकी वाहने अस्थाव्यस्थ लावलेली आहेत. जय भवानी नगर परिसरातील वळणावर रस्ता अरुंद झाला असून, येथे रस्त्याकडेला बंद पडलेल्या गाड्या आहेत. मोरे विद्यालय चौकाच्या अलीकडे असलेल्या रस्त्याला हॉटेलांची संख्या वाढली आहे. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावलेली असतात. केळेवाडी व मोरे विद्यालयाकडे जाण्यासाठी अनेक वाहने चौकात उलट दिशेने येतात. त्यांच्यामुळे अडथळा ठरत आहेत.

पौड फाटा येथे दशभुजा गणपतीसमोरील सावरकर उड्डाणपुलाच्या खालून चालकांची खरी कसोटी सुरू होते. कोथरूड गावाकडून येणारी वाहने व पौड रस्त्याने येणारी वाहने येथे एकत्र होतात. त्यामुळे कोंडी हमखास होते. तसेच, दोन्ही रस्त्यांचे वाहतूक नियंत्रक दिवे एकाच वेळी सुरू झाल्यास आणखी कोंडी होते. तसेच, मेट्रोच्या कामामुळे येथून थेट नळस्टॉप चौकात जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे एसएनडीटी महाविद्यासमोरून वळसा घालून नळ स्टॉप चौकात यावे लागत आहे. या मार्गावर अरुंद रस्त्यामुळे बराच वेळ जात आहे. नळ स्टॉप चौकात पोचेपर्यंत वाहनचालक घामाघूम होत आहेत.

तसेच, नळ स्टॉप चौकातून डेक्कन मार्गे गेल्यास वेळ जास्तीचा जातो. त्यामुळे दुचाकीस्वार नदीपात्राच्या रस्त्याचा वापर करतात. त्यासाठी रजपूत वसाहतीतून जाणाऱ्या या अरुंद रस्त्यात रिक्षा किंवा मोटार घुसल्याने इतर वाहन चालकांना घामच फुटतो. आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था होते.

या मार्गावर दहा वर्षांपूर्वी सतत पडणारे खड्डे व त्यांची सुरू असलेली दुरुस्ती कामे, या त्रासामुळे नागरिक बेजार झाले होते. त्यानंतर सुमारे आठ वर्षांपूर्वी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास सुरवात आली. तेव्हापासून नागरिक या रस्त्‍यावर वाहतूक कोंडीच्या समस्यांचा सामना करत आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तरी समस्या संपेल, असे वाटत असतानाच मेट्रोच्या कामाला सुरवात झाली आणि पुन्हा वाहतूक कोंडी नशिबात आली. नळ स्टॉप चौकात होणाऱ्या कोंडीत अडकण्याची सवय असणाऱ्या कोथरूड-बावधनकरांना आता ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रात्री दहानंतर तर कोठून एकरी वाहतूक सुरू होईल आणि कोठून बंद होईल, याची खात्रीच राहिली नाही.

आवश्यक उपाययोजना

 • पदपथांवर झालेली अतिक्रमणे हटविणे

 • रस्त्याच्या कडेला लावल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी

 • बावधन व भूगावकडून महामार्गावर येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका केली पाहिजे

हडपसर रस्ता : वाहतुकीचा बोजवारा

हडपसर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे पुलाखालून वळविलेली वाहतूक... त्यामुळे वारंवार होणारी जीवघेणी वाहतूककोंडी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने घुसविलेली दुचाकी वाहने... मुख्य रस्त्यासह बीआरटीचे तुटलेले दुभाजक, कारवाईसाठी पोलिसांनी थेट रस्त्यावरच अडवून उभी केलेली वाहने, लष्कर परिसरात सुरू असलेली रस्ता दुरुस्तीची कामे व शहरातील अरुंद रस्त्यावरून कसरत करीत करावा लागणारा नियमीतचा हैराण करणारा प्रवास... हडपसर

ते शनिवारवाडा अशा केवळ अकरा किलोमीटरच्या मोटारसायकल प्रवासाला तब्बल एक तासाच्यावर वेळ लागत आहे. त्यामुळे हडपसर परिसरातून शहरात कामानिमित्त येणारे नागरिक या जीवघेण्या प्रवासाला सध्या पुरते वैतागले आहेत. हडपसरमधील वाहतूक नियोजनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची मागील महिन्यात बैठक घेण्यात आली होती, मात्र त्या बैठकीत सुचविलेल्या सूचनांवर अंमलबजावणी न झाल्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

हडपसर येथून प्रवासाच्या सुरवातीलाच वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या दिव्यातून मार्ग काढताना दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुलाखालून वळवलेल्या वाहतुकीमुळे जवळपास एक ते दीड किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या चक्रव्यूहातून बाहेर पडताना वाहचालकाच्या पुरते नाकीनऊ येत आहे.

मगरपट्टा चौकात पुलाखाली बसथांबा असल्याने प्रवासी थेट रस्त्यावर उभे राहिलेले असतात. चौकातच थांबा असल्याने बस पकडण्याच्या नादात प्रवासी इतर वाहतुकीचा विचार न करता पळत सुटतात. त्यावेळी अपघाताचा धोका निर्माण होत असतो. त्यातच पथारीवाल्यांनी ठिकठिकाणी आपले व्यवसाय थाटलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनासह वाहनचालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते.

हडपसर रस्त्यावर असलेला बीआरटी मार्ग पूर्ण मोडकळीस आलेला आहे. केवळ तेथील बसथांब्यापुरतीच या मार्गाची ओळख राहिली आहे. अन्यथा या मार्गावरून सर्रास इतर वाहतूक होत असते. अनेक वाहनचालक पुढे जाण्याच्या स्पर्धेत कधी बीआरटी मार्गातून, तर मध्येच कुठे बाहेरील मार्गावर येत असलेला दिसतो. जिथे जिथे बीआरटी मार्ग सुरू होतो अथवा संपतो त्या प्रत्येक ठिकाणच्या दुभाजकांची दुरवस्था झालेली आहे. बीआरटीसाठीचे सर्वच दुभाजक तुटलेले आहेत. अनेकवेळा त्याचे मोठे तुकडे थेट मार्गावर आडवे पडलेले असतात. त्यामुळेही अपघाताचा धोका वाढला आहे.

हडपसर वैदुवाडी येथील वाहतूक पोलिस ठाणे, भैरोबानाला व टर्फ क्लबजवळील वाहतूक पोलिस चौकीजवळ पोलिसांनी तपासासाठी थांबविलेली वाहने थेट रस्त्यावरच कारवाईसाठी उभी केली जातात. त्यामुळे इतर वाहनानांना अडथळा निर्माण होत असतो. टर्फ क्लबवरून कॅम्पातून पुढे जाताना आंबेडकर रस्त्यावर फेरीवाल्यांचा विळखा पडलेला दिसतो. मालधक्का चौक, जुना बाजार रस्ता वाहनांच्या वर्दळीच्या तुलनेत खूपच अरुंद असल्याने वाहतूक कोंडी ठरलेलीच असते.

रशियन सैन्य हडपसरमध्ये?

मागील काही दिवसांपासून हडपसर परिसरात वाहतूक कोंडीवरून समाजमाध्यमावर एक विडंबनात्मक मेसेज व्हायरल होत आहे. ‘रशियन सैन्याला युक्रेनमध्ये पोहोचायला एक तास लागला होता. मात्र, कदाचित हेच सैन्य हडपसरमार्गे पुढे जाणार असते, तर सैनिक पुलाखालीच अडकून पडले असते आणि त्यांनी येथून पुढे जाण्याऐवजी माघार घेतली असती,’ अशा आशयाचा तो मार्मिक संदेश होता.

आवश्यक उपाययोजना

 • सोलापूर रस्त्यावर हडपसरमार्गे जाणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा बंदी करणे.

 • हडपसरमध्ये पर्यायी रस्त्यांचा वापर वाढविणे.

 • पथारीवाले, फेरीवाले, अतिक्रमणांवर कारवाई करणे

Web Title: Arduous Journey Through Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top