‘आर्मी डे परेड’ पुण्याऐवजी बंगळूर शहरात होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

army parade

दरवर्षी सैन्यदलाचा हा सोहळा दिल्लीत पारंपारिक पद्धतीने पार पडतो. देशातील विविध भागात या परेडचे आयोजन केल्यास जास्ती जास्त लोकांना परेड पाहणे शक्य, तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना देखील लष्करात जाण्याची प्रेरणा मिळेल.

‘आर्मी डे परेड’ पुण्याऐवजी बंगळूर शहरात होण्याची शक्यता

पुणे - भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा सोहळा मानला जाणारा म्हणजेच सैन्यदल दिनानिमित्त होणारी ‘आर्मी डे परेड’. देशाची राजधानी दिल्ली येथे पारंपारिक पद्धतीने होत असलेल्या या सोहळ्याला दक्षिण मुख्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय सैन्यदलाद्वारे घेण्यात आला होता. त्यानुसार ही परेड पुण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ही १५ जानेवारी रोजी होणारा हा संचलन सोहळा दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख कार्यालय असलेल्या पुणे शहराऐवजी बंगळूर येथे होणार असल्याचे समजत आहे.

दरवर्षी सैन्यदलाचा हा सोहळा दिल्लीत पारंपारिक पद्धतीने पार पडतो. देशातील विविध भागात या परेडचे आयोजन केल्यास जास्ती जास्त लोकांना परेड पाहणे शक्य, तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना देखील लष्करात जाण्याची प्रेरणा मिळेल. या उद्देशाने सर्व लष्करी सोहळ्यांना दिल्लीबाहेर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशाला अनुसरून ही परेड दिल्लीबाहेर आयोजित करण्यात येत आहे. त्यात ही परेड दक्षिण मुख्यालयाच्या भागात आयोजित करावी असे ही स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान १५ जानेवारी २०२३ रोजी होणारी ‘आर्मी डे परेड’ आता दक्षिण मुख्यालया अंतर्गत येणाऱ्या बंगळूर शहरात होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या निर्देशानुसार नुकतेच हवाईदलाद्वारे चंडीगड येथे हवाईदल दिनानिमित्त संचलन सोहळा व फ्लायपास्ट आयोजित करण्यात आले.

याबाबत ज्ज्ञ लेफ्टनंट जनरल दत्तात्रेय शेकटकर (निवृत्त) म्हणाले, ‘‘आर्मी डे परेडसाठी पुण्यात नक्कीच पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र बंगळूर येथे याच्या आयोजना मागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु पहिले भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल के.एम करिअप्पा यांचा जन्म हा कर्नाटकचा असल्याने कदाचित बंगळूर येथे या परेडचे आयोजन केले असावे. दरवर्षी वेगवेगळ्या भागात ही परेड होणार असल्याने कदाचित २०२४ मध्ये पुण्यात या परेडचे आयोजन केले जाऊ शकते.’’

दक्षिण मुख्यालयाबाबत -

- दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित ११ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेश

- मुख्यालयांतर्गत देशाचा सुमारे ४१ टक्के भूभाग

- ५३ लष्करी तळांवर मुख्यालयाच्या ४३ प्रशिक्षण संस्था

- भारतातील सर्वांत जुने लष्करी मुख्यालय असलेले दक्षिण मुख्यालयाची स्थापना १८९५ मध्ये पुण्यात झाली

- २१ एप्रिल १९४२ रोजी ‘बॉम्बे आर्मी’ असे नामकरण करून बंगळूर येथे मुख्यालय हलविण्यात आले

- १ जुलै १९४६ रोजी पुन्हा या मुख्यालयाला ‘दक्षिण मुख्यालय’ असे नामकरण करून पुण्यात आणण्यात आले

‘आर्मी डे’ परेड बाबत -

दरवर्षी १५ जानेवारीला सैन्यदल दिन साजरा केला जातो. १९४९ मध्ये याच दिवशी भारताचे पहिले सैन्यदलाचे ‘कमांड इन चीफ म्हणून जनरल के.एम. करिअप्पा यांची नियुक्ती झाली होती. तेव्हा पासून दरवर्षी १५ जानेवारी हा सैन्यदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने ही ‘आर्मी डे परेड’ दिल्ली येथे पार पडत होती.

याचा ही विचार करणे आवश्‍यक -

आर्मी डे परेडसाठी आता विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या रेजिमेंटमधील सैनिक, तसेच रणगाडे, क्षेपणास्त्रे व इतर शस्त्र प्रणाली दिल्ली छावणीतून संबंधित राज्यात जाणार. त्यानंतर त्वरित प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यासाठी पुन्हा दिल्लीला या शस्त्र प्रणालीसह रेजिमेंटमधील सैनिकांना परतणे. यामुळे लॉजिस्टिकची समस्‍या निर्माण होऊ शकते.

पुण्यात सोहळ्याचे आयोजन यामुळे योग्य ठरले असते -

- दक्षिण मुख्यालय कार्यालय पुण्यात

- येथे ही संचलन सोहळ्यासाठी परेड ग्राउंड उपलब्ध

- मुख्यालय येथे असल्याने सर्व प्रकारच्या दळणवळणाच्‍या, संसाधनांची उपलब्धता

- विविध लष्करी संस्था, आस्थापने पुण्यात असल्याने आर्मी डे परेडसाठी आलेल्या तरुणांना या संस्थांना पाहण्याची संधी

'भारतीय सैन्यदलात एकूण सात मुख्यालय आहेत. दरम्यान ही परेड दक्षिण मुख्यालया अंतर्गत येणाऱ्या राज्यांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय असल्याने हे मुख्यालय पुण्यात असून पायाभूत सुविधांना पाहता हा सोहळा पुण्यात होऊ शकतो अशी शक्यता होती. तसेच येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) परेड ग्राउंड परेडसाठी वापरले जाऊ शकले असते. मात्र आर्मी डे परेडचे आयोजन बंगळुरूत केले जाणार याबाबत माहिती मिळत आहे.'

- मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त), संरक्षण तज्ज्ञ