दुर्मिळ शस्त्रक्रिया करत नवजात अर्भकाचे प्राण वाचविण्यात लष्करी डॉक्टरांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stenting surgery on new born baby

स्टेन्टिंग ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करत जन्मजात हृदय विकाराचा आजार असलेल्या नवजात अर्भकाचे प्राण वाचविण्यात लष्करी डॉक्टरांना यश आले आहे.

दुर्मिळ शस्त्रक्रिया करत नवजात अर्भकाचे प्राण वाचविण्यात लष्करी डॉक्टरांना यश

पुणे - येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) संस्थेत ‘पेटंट डक्टस आर्टेरिओसस’ (पीडीए) स्टेन्टिंग ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करत जन्मजात हृदय विकाराचा आजार असलेल्या नवजात अर्भकाचे प्राण वाचविण्यात लष्करी डॉक्टरांना यश आले आहे. या शस्त्रक्रियेत हृदयविकार तज्ञ, छाती तज्ञ आणि हृदयशस्त्रक्रिया भूल तज्ञांच्या पथकाचा समावेश होता.

अवघ्या दीड किलोग्रॅम इतक्या वजनाच्या या नवजात अर्भकाचा जन्म फुफ्फुसाच्या झडपा बंद असलेल्या पल्मनरी अट्रेसिया या विकारासह झाला होता. छोट्या नळीसारखी रचना असलेल्या व फुफ्फुसाच्या धमन्याकडे होणाऱ्या रक्तप्रवाहाला मात्र पेटंट डक्टस आर्टेरिओससमुळे अडचणी येत होत्या. रक्तप्रवाहाला येणारी अडचण आणि त्यात या नवजात अर्भकाच्या रक्तवाहिन्या अतिशय लहान असल्याने अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते. परंतु या सर्व आव्हानांना सामोरे जात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने प्रयत्न करत ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर आता या नवजात अर्भकाची प्रकृतीत सुधार होत असल्याचे एआयसीटीएस मार्फत सांगण्यात आले.

एआयसीटीएस बाबत -

एआयसीटीएस हे लष्कराचे सुपर स्पेशालिटी उपचार केंद्र म्हणून ओळखले जाते. या उपचार केंद्रातील लष्करी डॉक्टरांच्या अतिशय कार्यक्षम पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व प्रकारच्या हृदयविकाराच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. जन्मतःच हृदयविकाराचे आजार असलेल्या बालकांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याचे हे केंद्र अग्रस्थानी राहिले आहे.