

मयुरेश प्रभुणे, सकाळ न्यूज नेटवर्क
पुणे, ता. २८ : दुष्काळी स्थितीशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात अर्णव चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वातावरणाच्या वरच्या थरात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी चक्रीवादळाचा मार्ग रोखल्यामुळे पावसाचा जोर पूर्व किनारपट्टीपुरता मर्यादित राहिल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
उत्तर हिंदी महासागरातील यावर्षीचे पहिले चक्रीवादळ असलेल्या अर्णवकडून महाराष्ट्रासह मध्य भारताला चांगला पाऊस मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा जमिनीवर प्रवेश झाल्यानंतर ते तेलंगण, छत्तीसगडमार्गे पूर्व मध्य प्रदेशापर्यंत प्रवास करणे अपेक्षित होते. वादळाचा प्रवास अंदाजित मार्गाने झाला असता, तर महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता होती. मात्र, बहुतेक वेळा चक्रीवादळाचा अचूक अंदाज देणारे ‘आयएमडी’चे मॉडेल यावेळी मात्र अयशस्वी ठरल्याचे दिसून आले.
‘आयएमडी’च्या अंदाजानुसार अर्णव चक्रीवादळ बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी १२ च्या दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडून उत्तर दिशेने सरकणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र, चक्रीवादळाने सात तास आधीच, पहाटे दोनच्या सुमारास किनारपट्टी ओलांडली आणि बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते किनारपट्टीवरच रेंगाळताना दिसले. बुधवारी मध्यरात्री आंध्र प्रदेशावरच त्याची तीव्रता कमी झाल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात आले.
अर्णव चक्रीवादळापासून महाराष्ट्राला फारसा लाभ न मिळण्यामागे महाराष्ट्र आणि मध्य भारतावरून वातावरणात सुमारे पाच ते दहा किलोमीटर उंचीवरून पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा तीव्र प्रवाह कारणीभूत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या प्रवाहामुळे वादळाचा उत्तर- वायव्येकडील मार्ग रोखला गेला आणि वादळ किनारपट्टीच्या दरम्यान राहून आंध्र प्रदेश आणि ओडिशात मोठा पाऊस नोंदला गेला.
-------------
आणखी एक चक्रीवादळ?
दक्षिण अंदमानच्या समुद्रात वातावरणात सहा किलोमीटर उंचीवर बुधवारी चक्रीय स्थिती निर्माण झाली. त्याच ठिकाणी गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. हे क्षेत्र वायव्येकडे सरकताना त्याची तीव्रता वाढत जाणार असून, त्यापासून दोन नोव्हेंबरला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र किंवा आणखी एक चक्रीवादळ तयार होऊ शकते, असा अंदाज काही मॉडेलमधून वर्तविण्यात येत आहे. मात्र, यावेळीही पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे हे क्षेत्र पूर्व किनारपट्टीपुरते मर्यादित राहू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.