आरोग्यम्‌ धनसंपदा!

dcf-health
dcf-health

अत्यंत वेगाने झालेल्या शहरीकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झालेली वाहतुकीची समस्या, प्रदूषणाची वाढलेली पातळी ही आव्हाने आहेतच; पण बदललेली जीवनशैली आणि सातत्याने वाढत जाणारा ताणतणाव यांचा दुष्परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यातून स्थूलता आणि वंध्यत्व या मुख्य समस्यांनी शहरी तरुणांना ग्रासले आहे... 

देशातील अत्यंत वेगाने नागरीकरण झालेल्यांपैकी पुणे शहर आहे. शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी स्थायिक होण्यासाठी याच शहराला पसंती दिल्याचे दिसते. शहर झपाट्याने विस्तारत आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे आणि आताचे पुणे यात कमालीचा बदल झाल्याचे आपल्या सर्वांनाच जाणवते. या बदलामुळे पुण्याला ‘आयटी सिटी’सारखी नवीन बिरुदावली मिळाली असून, त्यातून पुण्यात तरुणांना रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या संधी ही या बदलाची निश्‍चितच सकारात्मक बाजू आहे; पण या शहरीकरणामुळे झपाट्याने शहरातील रस्त्यारस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली. प्रदूषणाची पातळी धोक्‍याच्याही वर गेल्याचे आपण चौका-चौकात ‘सफर’ने लावलेल्या फलकांवर पाहात असतो. शहरीकरणाने जीवनशैली बदलली. या सर्वांचा थेट दुष्परिणाम आरोग्यावर निश्‍चित दररोज होत आहे. त्यातून वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याची धोक्‍याची पातळी वाढत आहे. 

सार्वजनिक आरोग्याचे आव्हान 
लोकसंख्येची घनता वाढली की, त्यातून पहिला धोका हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला निर्माण होतो. स्वाइन फ्लूचा झालेला भयंकर उद्रेक आपण सर्वांनी अनुभवला आहे. हवेतून वेगाने पसरणाऱ्या ‘एच१एन१’ विषाणूंनी पुण्याला हादरून टाकले होते. त्यानंतर कीटकजन्य डेंगी आणि चिकुनगुनियाचा गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी झालेल्या उद्रेकाचेही आपण साक्षीदार आहोत. चिकुनगुनियामुळे अद्यापही अनेक पुणेकरांना सांधेदुखीच्या वेदना असह्य होत आहेत. शहरीकरणामुळे रोजच्या रोज हजारो टन कचरा निर्माण होतो. त्यातून कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडते. त्याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतो. आपल्या शेजारच्या उपनगरांमध्ये या कचऱ्याच्या समस्येतून झालेली जनआंदोलनेही आपण पाहिली आहेत. 

शहरीकरणाने वाढतेय स्थूलता
स्थूलता किंवा त्याला सामान्यतः आपण लठ्ठपणा असे म्हणतात. याकडे आत्ता-आत्तापर्यंत आपण आजार या दृष्टीने कधीच पाहत नव्हतो. एखादा माणूस जास्त खातो, व्यायाम करत नाही म्हणून तो लठ्ठ होतो, अशी आपली आत्तापर्यंतची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी होती; पण यामागे शहरीकरण हे प्रमुख कारण असल्याचे आता समोर आले आहे. तसेच, हा असंसर्गजन्य आजार आहे. त्याचे प्रमाण शहरी लोकसंख्येमध्ये वेगाने वाढत आहे. शहरीकरणाचा पहिला परिणाम म्हणजे खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. त्याची सुरवात खऱ्या अर्थाने लहान मुलांमध्ये सर्वाधिक वेगाने होत आहे. त्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता ही आता भविष्यातील धोक्‍याची घंटा आहे. ‘फास्ट फूड’, ‘जंक फूड’, ‘स्ट्रीट फूड’, हॉटेलमध्ये जेवण्याचे वाढलेले प्रचंड प्रमाण; पिझ्झा, बर्गर अशा पाश्‍चात्त्य अन्नपदार्थांकडे वाढलेला ओढा. त्या बरोबरच शीतपेयाचे घोट घेण्याची सवय या सर्वांचा परिणाम शरीरावर होतो. ज्या प्रमाणात आपण हे पदार्थ खातो, त्यातून खूप मोठ्या प्रमाणात शरीराला उष्मांक मिळतात. व्यायाम, मैदानावर तासन्‌तास खेळणे यातून शरीराला मिळालेली ही ऊर्जा वापरली जाते; पण एकाच जागी बसून संगणक, मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही यांच्या ‘स्क्रीन’वर खेळ खेळण्यास मुले पसंती देत आहेत. त्यामुळे या खाद्यपदार्थांमधून मिळालेले उष्मांक शरीरात तसेच साठत राहतात. त्यातून स्थूलतेची समस्या वाढत आहे. 
लहान मुलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवत असली तरी पस्तिशी-चाळिशीच्या माणसांमध्येही हे प्रमाण धोक्‍याच्याही वर गेले आहे. कामातून येणारे ताणतणाव, बैठे काम, आहाराच्या बदललेल्या सवयी या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून ही समस्या निर्माण होत आहे. जीवनशैली आणि साथीच्या आजारांबाबत शहरी भागात असलेले हेच चित्र बारामती, नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरसारख्या निमशहरी भागात तसेच ग्रामीण भागातही बाळसे धरू लागले आहे. तेथील नागरिक आणि शालेय मुलांमध्ये बदलेल्या जीवनशैलीमुळे विशेषतः स्थूलतेची समस्या भेडसावू लागली आहे. साहजिकच त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या मूळ धरू लागल्या आहेत. 

वंध्यत्वाचे संकट
बदललेल्या जीवनशैलीमुळे शहरातील दांपत्यांमध्ये वंध्यत्व वाढत आहे. वर्षानुवर्षे प्रदूषित हवा श्‍वसनातून आपल्या शरीरात आपण घेत असतो. त्याचे दूरगामी विपरित परिणाम आरोग्यावर होत आहेत. वाढणारा ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यसनाधीनता आणि करिअरकेंद्रित दृष्टिकोन यामुळे महिलांमध्येसुद्धा वंध्यत्वाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पस्तिसाव्या वर्षीच आजकाल बीजनिर्मिती कमी होताना दिसत आहे आणि लवकरच हे वय पस्तीसवरून तीसपर्यंत खाली येण्याचा धोका आहे.

तंबाखू, धूम्रपान, मद्यपान आणि मादक द्रव्ये याचा सर्वाधिक परिणाम प्रजननसंस्थेवर होत असतोच, त्याच बरोबर प्रदूषणामुळेही वंध्यत्व येत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. दूषित हवा, शिसे, पारा यांसारखे जड धातू, जंतुनाशके, किरणोत्सर्ग याचा प्रत्यक्ष परिणाम प्रजननक्षमतेवर होत असतो. 

‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात मांडीवर लॅपटॉप घेऊन तासन्‌तास काम करणारे कर्मचारी आपल्याला दिसतात; पण मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपची उष्णताही प्रजननक्षमता घटवण्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशाराही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

ग्रामीण आरोग्य
मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, वंध्यत्व अशा असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वेगाने वाढत असताना शहराजवळील ग्रामीण भागदेखील त्याला अपवाद राहिला नाही. बारामती, इंदापूर, सासवड, मंचर अशा वेगाने विकसित होणाऱ्या भागातील नागरिक आता मधुमेहाची नियमितपणे औषधे घेत असताना दिसतात. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन  राज्याच्या आरोग्य खात्याने असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध आणि उपचाराची योजना ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी जगभरात जे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत, त्याबाबत मुंबईत २४ व २५ जानेवारीला होणाऱ्या डीसीएफ परिषदेमध्ये आंतराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ माहिती देणार आहेत. 

तीन वर्षांमध्ये हे होणे अपेक्षित
लहान मुलांमधील स्थूलता कमी करण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम 
पालकांना आणि शिक्षकांना चौरस आहाराचे महत्त्व पटवून देणे 
‘हेल्दी टिफीन’ची संकल्पना पालकांपर्यंत पोचविणे
वंध्यत्वाबाबत शास्त्रीय माहिती महाविद्यालयीन तरुणांना देणे

----------------------------

मान्यवर वक्ते

----------------------------
कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम
पेत्रा ओशावस्की, मंत्री विज्ञान, संशोधन आणि कला मंत्रालय, बाडेन वुर्टेनबर्ग, जर्मनी  (१२ मे २०१६ पासून)

स्टु टगार्ड येथे जन्मलेल्या ओशावस्की यांनी कलांशी संबंधित व्यवसायांत काम केल्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी कलेचा इतिहास आणि जर्मनी यावर अभ्यास केला. शिकत असतानाच त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी मुक्त पत्रकार म्हणून आणि काही पुस्तक प्रकाशकांसाठी संपादक म्हणून काम केले. वस्त्रप्रावरणे अभ्यासक्रमातही त्यांनी अध्यापन केले. प्रशिक्षणाला सुरवात केल्यानंतर त्यांनी १९९६ ते २००२ या कालावधीत स्टुटगार्टर झाईटुंग या नियतकालिकात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. स्टुटगार्ट स्थानिक परिषदेच्या सांस्कृतिक समितीवर त्या कार्यरत आहेत. शिवाय, स्टुटगार्ट स्टेट ॲकॅडमी ऑफ फाइन आर्टस्‌च्या पहिल्या महिला रेक्‍टरसह जर्मनीतील विविध संस्थांत त्या जबाबदारीच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.

स्नॅप ॲप्लिकेशनची मुहूर्तमेढ रोवली
असाफ किंडलर, सहसंस्थापक, स्नॅप

मोबाईलद्वारे २०२० मध्ये दोन अब्ज इंटरनेट वापरकर्ते आणि ११२ दशलक्ष व्यावसायिकांना उपयुक्त ऑनलाइन आदानप्रदान करणे शक्‍य व्हावे, या उद्देशाने किंडलर यांनी सिंग्युलॅरिटी विद्यापीठातील आपल्या दोन सहअध्यायींसोबत स्नॅपची मुहूर्तमेढ रोवली. पेरेस सेंटर फॉर पीस इकॉनॉमिकशीही किंडलर संबंधित आहेत. स्नॅपचे ॲप्लिकेशन जानेवारी २०१६ मध्ये लाँच झाले असून, गुगल प्लेवरून दोन लाख लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. दररोज सरासरी दोन हजार जण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करत आहेत. स्नॅप बिल्डरद्वारे अनेक व्यावसायिकांना ऑनलाइन येण्यास मदत झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना नवे ग्राहक मिळवणे, त्यांच्याशी संवाद साधणे, व्यवहार करणे आणि या सर्वांसाठी गतिमानतेने त्यांच्यापर्यंत पोचणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायातही चांगली वृद्धी करणे शक्‍य झाले आहे. 

तज्ज्ञ म्हणतात
शहरीकरण आणि स्तन व गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोगाचा जवळचा संबंध आहे. हे दोन्ही प्रकारचे कर्करोग ताणतणाव, अयोग्य आहारपद्धती आणि करिअर करताना शरीराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे होतात. योग्य आहारातून मिळालेली पोषकद्रव्ये यासाठी महत्त्वाची असतात. ताणतणाव व्यवस्थापनाचे अनेक मार्ग आहेत. त्याचा निश्‍चित उपयोग होतो. तसेच प्रसूतीनंतर सहा महिने बाळाला स्तनपान देणे आवश्‍यक आहे.
डॉ. शैलेश पुणतांबेकर

आधुनिक काळात मुली करिअरला प्राधान्य देतात. त्यामुळे लग्न उशिरा करतात. त्यानंतर पहिल्या मुलाचेही ‘प्लॅनिंग’ केले जाते. अशा वेळी वयाची तिशी-पस्तीशी येते. त्यानंतर गर्भधारणेची क्षमता कमी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अलीकडच्या काळात वंध्यत्व वाढत असल्याचे चित्र दिसते. त्यातून मार्ग काढण्यासाठी अत्याधुनिक उपचार, प्रभावी औषधे आणि आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. 
डॉ. ममता दिघे

शहरी भागातील नागरिकांमध्ये डोळे कोरडे पडण्याचे प्रमाण हे ग्रामीण भागातील नागरिकांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या डोळ्यांचे आरोग्य या निकषाच्या तुलनेने चांगले दिसते. पण ग्रामीण भागात मोतिबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. त्या तुलनेत शहरात ते कमी जाणवते. तसेच स्मार्ट फोनमुळे लहान वयात चष्मा लागणाऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे. पूर्वी विशी-पंचविशीत चष्म्याचे प्रमाण जास्त नव्हते. ते आता प्रकर्षाने वाढत आहे.
डॉ. राहुल जोशी

स्थलांतर हे शहरीकरणाचे मुख्य कारण आहे. कर्तृत्व दाखविण्याची संधी शहरांमध्ये उपलब्ध असते. तसेच येथे आर्थिक उत्पन्न वाढविता येते. त्यामुळे हे स्थलांतर होते. शहरीकरणात सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्य याचा समतोल सांभाळला पाहिजे. पण त्यासाठी आता आपण वैयक्तिक आरोग्याची मोठी किंमत मोजत आहोत. आपल्या कुटुंबीयांना असणारे आजार ओळखून त्यांना प्रतिबंध होईल, अशी जीवनशैली स्वीकारली पाहिजे.
डॉ. समीर जोग

शहरीकरणामुळे पर्यावरणाचे प्रदूषण वाढते. अशा प्रदूषणामुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्यात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. शहरीकरणामुळे कामाच्या वेळा निश्‍चित नसल्याने जेवणाचीही वेळ पाळली जात नाही. ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचा सतत ताण असतो. त्यातूनही हृदयरोग वाढतो. त्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन, चौरस आहार, नियमित व्यायाम आणि विश्रांती आवश्‍यक आहे.
डॉ. अमित सिनकर

शहरी नागरिकांमध्ये हाडांची ठिसूळता सामान्यतः दिसून येते. व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. हाडांना बळकट करण्यासाठी योग्य पोषकद्रव्ये मिळत नाहीत. शहरातील नागरिकांच्या आहारात जंक फूडचे प्रमाण जास्त असते. तसेच कामाचा ताण, वारंवार घेतली जाणारी चहा-कॉफी याचा परिणाम हाडांच्या आरोग्यावर होत असतो. लहान मुलांमध्ये मुडदूससारखे रोग होतात. तसेच वातानुकूलित कार्यालयांमुळे जंतूसंसर्गाचे प्रमाणही वाढते. 
डॉ. निखिल लिखते

मधुमेह हा आता फक्त शहरी भागातील आजार राहिला नाही. ग्रामीण भागातही मधुमेहाचे अनेक रुग्ण आढळत आहेत. मात्र, हे रुग्ण स्वतःच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे पायांना जखमा होतात. त्या लवकर लक्षात येत नाहीत. त्यात जंतू संसर्ग होतो. त्यामुळे ही जखम वाढते आणि त्यातून रुग्णाचा पाय कापण्यापर्यंत परिस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे अशा रुग्णांवर प्रभावी उपचार करणे शक्‍य झाले आहे.
डॉ. मनीषा देशमुख

शहरातील प्रदूषणाचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असतो. डोळे लाल होणे, चुरचुरणे अशा सर्रास तक्रारी रुग्णांच्या असतात. शहरात एकाच जागी बसून बैठे काम करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातून मधुमेह आणि रक्तदाबासारखे विकार वाढतात. त्याचा दुष्परिणाम डोळ्यांवर होतो. तसेच सतत डोळ्यांपुढे संगणक, मोबाईल, टॅब असल्याने ‘कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोम’ वाढत असलेला दिसतो.
डॉ. आदित्य केळकर

माणूस शहरीकरणामुळे निसर्गापासून दूर जात आहे. ताण-तणावांपासून मुक्त राहणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. पण, आधुनिक काळातील धकाधकीच्या जीवनात दिनश्‍चर्या आणि ऋतुचक्राचे पालन तो करू शकत नाही. आयुर्वेदाने सांगितलेली पथ्यापथ्यं आणि आहार याचा विसर त्याला पडू लागला आहे. नैसर्गिकपेक्षा कृत्रिम गोष्टी केल्या जात आहेत. त्यामुळे आयुर्वेदाच्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे शरीरात दोष साचतात. त्यांचे योग्य वेळेत आणि योग्य ऋतूत शोधन केले जात नाही, त्यामुळे मानवी शरीर लवकर रोगाला बळी पडते.
डॉ. मंदार रानडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com