व्हिडिओ कॉलवर न्यूड व्हिडिओ बनविणाऱ्यास राजस्थानमधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉल करून तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.

Pune Crime : व्हिडिओ कॉलवर न्यूड व्हिडिओ बनविणाऱ्यास राजस्थानमधून अटक

पुणे - व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉल करून तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सतत आठ दिवस-रात्र रेकी करून राजस्थानमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा व्हॉटसअ‍ॅप डिपी असलेल्या मोबाईलवरून आरोपीने एका तरुणाला व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल केला. आरोपीने अश्लील चॅटिंगमध्ये गुंतवून त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला.

त्यानंतर तो व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. तसेच, जबरदस्तीने ‘फोन पे’वर पैसे पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर वारंवार तरुणाला त्याचे न्यूड व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची भीती दाखवून मानसिक त्रास देणे सुरूचहोते. त्यामुळे तरुणाने ‘मैं सुसाईड कर रहा हूं’ असा मेसेज पाठविला. तरीही आरोपीने ‘करो मैं व्हिडिओ ऑनलाइन करता हूं’ असे म्हणून सतत पैशांची मागणी केली. त्यामुळे तरुणाने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.

याबाबत सहकारनगर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. सहकारनगर पोलिसांचे एक पथक राजस्थान येथील सुकेती ता. सिकरी, जि. भरतपूर येथे पाठवली. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग आठ दिवस-रात्र रेकी करुन आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.