चित्रकलेच्या छंदाने उभी राहिली आर्ट गॅलरी

समाधान काटे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

रंग, रेषा आणि छटांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीच्या बळावर चित्रकलेमध्ये भरारी घेतलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहे. व्यावसायिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरावर चित्रकला चालत आहे. अशातच ७९ व्या वर्षीही चित्रकलेशी नाळ जोडून ठेवणारे सुनील देव यांनी काढलेली चित्रे न विकता घरातच आर्ट गॅलरी केली आहे. जवळपास २०० च्यावर येथे चित्रांचा संच तयार झाला आहे.

मयूर कॉलनी - रंग, रेषा आणि छटांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीच्या बळावर चित्रकलेमध्ये भरारी घेतलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहे. व्यावसायिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरावर चित्रकला चालत आहे. अशातच ७९ व्या वर्षीही चित्रकलेशी नाळ जोडून ठेवणारे सुनील देव यांनी काढलेली चित्रे न विकता घरातच आर्ट गॅलरी केली आहे. जवळपास २०० च्यावर येथे चित्रांचा संच तयार झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देव हे कोथरूड येथील मयूर कॉलनीत राहतात. त्यांनी घरातच चित्र काढून त्यांची वेगळी गॅलरीच तयार केली आहे. बनवलेली निसर्गरम्य चित्रे आकर्षक ठरत आहेत. बी. ई. सिव्हिलपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. 

शाळेत असल्यापासून चित्र काढण्याची त्यांना आवड निर्माण झाली. पदवीनंतर चित्रकलेमध्ये मन जास्त रमू लागले. खासगी नोकरी करत असतानादेखील ते चित्र काढत. तोच छंद त्यांनी कायम जोपासला. आजदेखील त्याच आवडीने ते चित्रे रेखाटत आहेत. ऑइल पेंटने चित्र रंगवली जातात, त्यामुळे चित्रांना आकर्षकपणा येतो.

देव सांगतात, चित्र बनवण्याच्या अगोदर संबंधित चित्राचा अभ्यास करतो. चित्र कोणते काढायचे, हे मनात ठरवतो. चित्रामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. एखाद्या कलेचे किंवा व्यक्तीचे चित्र काढायचे असेल, तर त्या व्यक्ती अथवा कलेविषयी पुस्तके वाचतो. त्याचा परिपूर्ण अभ्यास करतो आणि नंतरच चित्र काढायला सुरुवात करतो. एक चित्र काढण्यासाठी ३ ते ६ महिने वेळ लागतो. चित्र आशयपूर्ण पाहिजे. त्यामधून अर्थ मिळाला तरच चित्राला महत्त्व आहे. 

सध्या चित्रकलेला सुगीचे दिवस आले आहेत. चित्र खरेदीसाठी हौशी मंडळी कोट्यवधी रुपये खर्च करतात. आजपर्यंत काढलेल्या चित्रांमधून एकही चित्र मी विकलेले नाही. चित्र काढण्याबरोबर नियमित व्यायामदेखील करतो. त्यामुळे शरीरयष्टी मजबूत आहे, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मी १० वर्षांपूर्वी कलानंदन आर्ट हा ग्रुप स्थापन करून अनेक ठिकाणी चित्र प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनांचे उद्‌घाटन बहुतेक वेळा विशेष मुलांच्या हस्तेच केले जाते. मी स्वतः काढलेली चित्रे या प्रदर्शनात विकत नाहीत. दरवर्षी विशेष मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करतो. तसेच इतर चित्रकारांना या प्रदर्शनात सहभागी करून घेतो.  असे देव यांनी सांगितले. जोपर्यंत मनाला समाधान वाटत नाही, तोपर्यंत चित्र काढत असतो. मनामध्ये आलेल्या चित्रांच्या भावना प्रत्यक्ष रेखाटतो, असे देव म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Art Gallery stands out from the hobby of painting