Vidhan Sabha 2019 : महापौरांना उमेदवारी; वाचा पुण्याचा इतिहास काय सांगतो?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

महापौरपदाची जबाबदारी असताना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या संधीचा पहिला मान महापौर मुक्ता टिळक यांना मिळाला. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे तिकिट मिळाले असून, पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीमुळे महापौरपदाची मुदत तीन महिन्यांनी वाढविल्याने टिळक यांना ही संधी मिळाली आहे.

पुणे : महापौरपदाची जबाबदारी असताना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या संधीचा पहिला मान महापौर मुक्ता टिळक यांना मिळाला. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे तिकिट मिळाले असून, पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीमुळे महापौरपदाची मुदत तीन महिन्यांनी वाढविल्याने टिळक यांना ही संधी मिळाली आहे.

महापौरपद भूषविलेल्या पुण्यातील नेत्यांनी विधिमंडळ आणि संसदेत प्रतिनिधित्व केले. त्यात शहराचे पहिले महापौर बाबुरास सणस यांच्यासह 2003-04 या काळात महापौरपदावर असलेल्या दिप्ती चवधरी यांचा समावेश आहे. परंतु, महापौरपदावर असताना थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी आतापर्यंत कोणाला मिळाली नव्हती. ही संधी टिळक यांनाच मिळाली आहे. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता येताच त्यांची पक्षाच्या पहिल्या महापौर म्हणून निवड झाली.

हे पद त्यांच्याकडे अडीच वर्षांसाठी होते. त्यानुसार 15 सप्टेंबरला त्यांची मुदत संपली. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे पुण्यासह राज्यातील अन्य शहरांच्या महापौरपदाची निवड तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मुदत संपूनही महापौरपद टिळक यांच्याकडेच राहिले. याच काळात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने महापौरपदावर असताना भाजपकडून निवडणूक लढविण्याची संधी टिळक यांना मिळाली. महापालिकेत सलग चारवेळा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

यापूर्वी महापौर असलेले बाबुराव सणस, नामदेवराव मते, माजी मंत्री (कै) चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर आदी नेते आमदार झाले. पण, महापौरपदाची मुदत संपल्यानंतरच. याशिवाय, वंदना चव्हाण या राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. दिप्ती चवधरी या विधान परिषदेच्या सदस्य होत्या.

महापौर टिळक म्हणाल्या, "गेली अडीच वर्ष मी पुण्याचे नेतृत्व करीत आहेत. कामाच्या बळावर पक्षाने मला संधी दिली आहे. माझ्या कामाचा झपाटा कायम असेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Candidacy for Pune mayor in assambly election