
निर्झरी चिंचाळकर ही सध्या जपानी भाषा शिकते आहे. शब्द लक्षात राहावेत म्हणून घरभर तिने अनेक वस्तूंवर चिठ्ठ्या चिकटवल्या आहेत. त्यांवर त्या वस्तूला जपानीत काय म्हणतात, ते लिहिलं आहे. आई-बाबांशी अचानक जपानीत बोलणं, त्याचा अर्थ सांगणं असं करत ती त्यांनाही जपानी भाषा शिकवते आहे.
निर्झरी चिंचाळकर ही सध्या जपानी भाषा शिकते आहे. शब्द लक्षात राहावेत म्हणून घरभर तिने अनेक वस्तूंवर चिठ्ठ्या चिकटवल्या आहेत. त्यांवर त्या वस्तूला जपानीत काय म्हणतात, ते लिहिलं आहे. आई-बाबांशी अचानक जपानीत बोलणं, त्याचा अर्थ सांगणं असं करत ती त्यांनाही जपानी भाषा शिकवते आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘ओझायो गोझाइमास,’ असं म्हणत ती स्मित हास्य करते. कळलं नाही ना? तिने जपानी भाषेत उच्चारलेल्या या शब्दांचा अर्थ आहे ‘सुप्रभात.’ ती हळूच असंही विचारते, ‘ओनामा एवा नानू देसका.’ म्हणजे ती तुमचं नाव विचारत असते. तिचं नाव आहे निर्झरी चिंचाळकर. ती इयत्ता सातवीत आहे. नाट्यकर्मी मंगेश आणि गायिका - अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांची ही मुलगी. बाबांकडून व्हायोलिन व आईकडून गाणं ती शिकते आहे. आई भूमिका करत असलेल्या अनेक संगीत नाटकांमधली पदं तिला पाठ आहेत. गेल्या वर्षी निर्झरीने एका संस्थेत जपानी भाषा शिकायला सुरवात केली. ती म्हणाली, ‘‘खूप आधीपासून मला जपानी भाषा आणि संस्कृतीबद्दल कुतूहल होतं.
आपल्याला जपानीत छान बोलता आलं पाहिजे, असं वाटायचं. आता मी ही भाषा जास्तीत जास्त ऐकायला मिळावी म्हणून बरेचसे व्हिडिओ बघते. त्यातलं संगीत आवडायला लागलं म्हणून काही गाणी पुन्हा पुन्हा इतक्यांदा ऐकली की ती पाठ झाली. मी ती गाते. एका कार्यक्रमात मी जपानी मुलीची वेशभूषा करून संवाद म्हटले होते.’’
निर्झरीने असंही सांगितलं की, घरातील वेगवेगळ्या वस्तूंचा उपयोग मी जपानी भाषा शिकण्यासाठी करत असते. रेडिओ, टीव्ही, फ्रिज, कपाट, टेबल अशा वस्तूंवर मी चिठ्ठ्या चिकटवल्या आहेत. त्या वस्तूला जपानीत काय म्हणतात, ते लिहून ठेवलं आहे.
येता-जाता ते शब्द दिसतात. ते मोठ्याने म्हणते. या मजेशीर युक्तीमुळे माझ्या शब्दसंग्रहात सारखी भर पडत असते. मी कथक नृत्य शिकते, पण आता मला जपानी नृत्यही खूप आवडायला लागलं आहे. जपानी संवाद मी एकापाठोपाठ म्हणू लागले की, एखाद्या जपानी नाटकाची तालीम करते आहेस का, असं आई मला विचारते. आता एक गंमत, बरं का! खावा (नदी), आसोबिमास (खेळणे), किरेई (सुंदर), ओईशी (स्वादिष्ट) आणि यामा (पर्वत). हे काही जपानी शब्द जाता जाता तुम्हाला सांगते आहे. हे तुम्ही इतरांशी बोलून बघा. त्यांना अर्थ नाही कळला तर तुम्ही सांगा.