Video : मालविकाला तालवाद्यांचा जडला छंद

नीला शर्मा
Wednesday, 20 May 2020

मालविका तुळाणकर ही डाउन सिंड्रोम कंडिशनमधली मुलगी विविध तालवाद्यं कौशल्याने वाजवते. जीवन हे संगीत मानलं तर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ताल धरता येणं, हा परम सुखाचा ठेवा असल्याचं तिचा कलाविष्कार पाहून लक्षात येतं.

entertainment मालविका तुळाणकर ही डाउन सिंड्रोम कंडिशनमधली मुलगी विविध तालवाद्यं कौशल्याने वाजवते. जीवन हे संगीत मानलं तर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ताल धरता येणं, हा परम सुखाचा ठेवा असल्याचं तिचा कलाविष्कार पाहून लक्षात येतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिने नेहमीच व्याधींवर हसत मात केली आहे. ती डाउन सिंड्रोम कंडिशनमधली आहे, पण म्हणजे नेमकं काय, हे तिला ठाऊक नाही. तिला कळतं ते सदैव आनंदात राहणं. तिचं नाव आहे मालविका तुळाणकर. तिची आई (माधवी) एका बॅंकेत नोकरी करते. त्या म्हणाल्या, ‘‘वर्षभराची असताना हृदयावर शस्त्रक्रिया, दहा वर्षांची असताना मणक्‍याची शस्त्रक्रिया, नंतर एकदा सहा महिने भोगलेला संधिवाताचा जबरी त्रास अशा व्याधींना तोंड देत मालविकाने हसत त्यावर मात केली. ती आता २२ वर्षांची आहे. मात्र त्याहून पुष्कळ लहान दिसते. कथक नृत्याची व गाण्याची आवड असल्याने तिला ते शिकवलं. आता एखादं गाणं ऐकून, त्यावर ती मनाने नृत्य बसवते. भरपूर चित्रं काढते. मला स्वयंपाकात मदत करते. घर कायम स्वच्छ व नीटनेटकं ठेवण्यासाठी ती धडपडते.’’

माधवी यांनी स्पष्ट केलं की, मालविकाचे बाबा (मिलिंद) हे जलतरंगवादक आहेत. त्यांच्या वादनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं तिला अतिशय प्रिय आहे. बाबांच्या सांगीतिक सहवासात ती ताल धरू लागली. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक-एक करून अनेक तालवाद्यं तिला आणून दिली. त्यापैकी रेन स्टीक, कबास, घुंगरू, शेकर्स, खंजिरी, चायनीज ब्लॉक्‍स अशी वाद्यं मालविकाच्या संग्रहात जमा होत गेली. ती आता या वाद्यांची नावं सांगत, त्यावर वादन करून दाखवते. स्मार्ट फोन किंवा टॅबच्या माध्यमातून गाणी निवडते. त्यावर योग्य ते तालवाद्य वाजवते. ट्रायपॉडवर फोन लावून स्वतःच्या तालवाद्यवादनाचं शूटिंग करते. बाबांबरोबर काही व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये तिने तालवाद्यांची साथ करून दाद मिळवली आहे. बाबा जेव्हा स्वतःच्या संस्थेतर्फे काही मैफली आयोजित करतात, तेव्हा रंगमंचावर मालविकाला बोलावून तिच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात येतो. हे क्षण मालविकासाठी अतीव सुंदर व समाधानाचे असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on malvika tulankar