Video : नेत्रबाधितांसाठी वाचनसेवेचा अविरत प्रयत्न

नीला शर्मा
रविवार, 24 मे 2020

प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पंचवीस स्वयंसेवक विविध विषयांवरील अभ्यासपुस्तकांच्या वाचनाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध करून देतात. याचा लाभ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांपर्यंत अनेकांना होतो. एवढंच नाही, तर यातून अवांतर वाचनाची गरजही भागविण्याचा प्रयत्न केला जातो.

प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पंचवीस स्वयंसेवक विविध विषयांवरील अभ्यासपुस्तकांच्या वाचनाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध करून देतात. याचा लाभ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांपर्यंत अनेकांना होतो. एवढंच नाही, तर यातून अवांतर वाचनाची गरजही भागविण्याचा प्रयत्न केला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कित्येक दृष्टिबाधितांसाठी ‘यशोवाणी’ हा उपक्रम वरदान ठरला आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी लागणारी अनेक विषयांवरील श्राव्य पुस्तकं ( ऑडिओ बुक्‍स) या माध्यमातून पुरवली जातात. हे मौलिक कार्य प्राची गुर्जर या सुमारे पंधरा वर्षांपासून अखंडपणे करत आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘मी गृहिणी असून, घरातील माझ्या जबाबदाऱ्यांबरोबरच मी हे काम सुरू केलं, ते कुणाच्या तरी उपयोगी पडण्याच्या भावनेतून. आधी आम्ही मुंबईत असताना मी एकटीच वाचनसेवा पुरवत होते. यजमानांची बदली झाल्याने आम्ही पुण्यात आल्यावर इथेही दोन-तीन संस्थांना वाचनसेवा हवी असल्याचं कळलं. त्यांच्यासाठी काम करताना काही महाविद्यालयीन विद्यार्थी पुस्तकं ध्वनिमुद्रित करून घेण्यासाठी संपर्कात आले. काम विस्तारत गेलं तसं माझ्या परिचयातील मंडळी यात आली.

त्यांच्या ओळखीतून आणखी माणसं जोडली गेली. गरजू व्यक्तींना जे पुस्तक ऑडिओ स्वरूपात हवं असेल ते आमच्याकडे दिलं जातं. मी ते स्कॅन करून निरनिराळ्या स्वयंसेवकांमध्ये वाटून देते. मोबाईल फोनवर ते मला ध्वनिमुद्रण पाठवतात. ते क्रमशः जोडणे आदी सेवांसाठी एक संपादकीय चमू आहे.’’

प्राचीताईंनी असंही सांगितलं की, तीन व्हॉटसअप ग्रुपवर वेगवेगळ्या दैनिकांमधील अग्रलेख, महत्त्वाच्या बातम्या व विशेष लेखांचं ध्वनिमुद्रण उपलब्ध करून दिलं जातं. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करणाऱ्या अनेक दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतो. खास त्यांच्यासाठी जसा त्यांना आवश्‍यक असलेल्या पुस्तकं व नियतकालिकांमधील मजकूर आम्ही उपलब्ध करून देतो, तसंच कुणी विद्यार्थी नसलेले, पण धार्मिक पुस्तकं, पोथ्या आदींमधील मजकूर वाचून हवा असलेल्यांनाही सेवा दिली जाते.

अवांतर वाचनसाहित्याचाही मोठा संग्रह आमच्याकडे आहे. साडेचार हजारांच्या आसपास मराठी, इंग्रजी व हिंदी पुस्तकांचा संग्रह उपलब्ध असून निरनिराळ्या महाविद्यालयांनाही तो पुरवण्यात आला आहे. देशभरातील विविध ठिकाणांहून दृष्टिबाधित विद्यार्थी फोनद्वारे हव्या त्या पुस्तकाची मागणी करतात. त्यांना ती लिंक पाठवली जाते.

या मंडळींसाठी जोडीला इंग्रजी संभाषणाचा ऑनलाइन अभ्यासक्रमही चालवला जातो. एखादी गृहिणी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्यात विकासासाठी साध्या, सोप्या पद्धतीने अधिकाधिक देवाणघेवाण कशी घडवून आणू शकते, याचं हे बोलकं उदाहरण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on prachi gurjar