पार्टी रंगली अन्‌ आम्हीही रंगलो रेऽऽ....

31st december party
31st december party

‘३१ डिसेंबरला पार्टी जोरात झाली पाहिजे,’ या मित्रांच्या प्रस्तावाला आम्ही कोरोनाच्या नावाखाली जोरात विरोध केला. ‘अरे बाबा, ३१ डिसेंबरला कोरोनाने सुटी घेतलीय. या दिवशी कितीही गर्दी झाली वा कोणी शिंकले, खोकले तरीही कोणालाही कोरोना होणार नाही,’ असे नितीनने छातीठोकपणे सांगितले व जीआरची का कशाची कॉपी दाखवण्यासाठी तो खिसे तपासू लागला. नंतर त्याने खिशातून तंबाखूची पुडी काढून, हातावर मळून जोरात थाप मारली. ‘कोरोनाच्या सुटीची’ ही त्याने अशीच ‘थाप’ मारली होती. 

‘यंदा ३१ डिसेंबर गुरुवारी आला आहे. त्यामुळे मस्तपैकी आपण साबुदाणा खिचडी, वरईचा भात आणि वेफर्स खाऊ. तसेच ईलायची टाकून मस्तपैकी दूध पिऊ.’ आम्ही खिंड पुन्हा लढवली. पण सगळ्यांनी माझ्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरं तर कोरोनापेक्षाही आम्ही या पार्टीला दुसऱ्याच कारणासाठी फार घाबरत होतो. अशा पार्टीत आमच्या बरोबरच्या मंडळींना कशाचीच शुद्ध राहत नाही. आपण कोण आहोत, कोठे आहोत, काय करतोय, याचे कशाचेही भान त्यांना राहत नाही. आम्ही एकटेच शुद्धीवर राहून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असतो, हा आमच्या इतक्‍या वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे या पार्टीला आमचा विरोध होता. पण सगळ्यांनीच तो मोडीत काढला. त्यातही खर्चाची जबाबदारी त्यांनी आमच्यावरच टाकली. त्यामुळे आमच्या दुःखात आणखी भर पडली. मात्र, आमची ही पार्टी नेहमीपेक्षाही चांगलीच रंगली. सुरवातीलाच स्वागत गीताप्रमाणे उपस्थित मित्रमंडळींवर एकमेकांनी स्तुतिसुमने उधळली तर अनुपस्थित असणाऱ्यांची निंदानालस्ती केली.

‘अरे मी त्याला एवढी मदत केली; पण तो गद्दार निघाला. त्याची लायकी नाही आपल्या सोबत पार्टीत यायला,’ इथपासून सुरु झालेला प्रवास ‘तूच माझा खरा मित्र. तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे,’ इथपर्यंत कधी पोचला, हे कळलेही नाही. थोड्याच वेळात त्यांची बोलण्याची भाषाही बदलली. जो तो इंग्रजी फाड फाड फाडू लागला. तेही फुल्ल कॉन्फिडन्समध्ये. इतर वेळी त्यांचे इंग्रजी कोठे जाते कोणास ठाऊक? बहुतेक हा सगळा ‘इंग्लीश’चा परिणाम असावा. अशा तऱ्हेने रात्री अडीच्या सुमारास पार्टी संपली. आम्ही सगळे आपापल्या घरी निघालो. मी पूर्ण शुद्धीवर होतो. गाडीही व्यवस्थित चालवू शकलो असतो. मात्र, तरीही रिस्क घ्यायची टाळली. स्वत: गाडी चालवून रस्त्यातील निरपराध लोकांचा जीव धोक्‍यात घालावा, असे मला बिलकूल वाटले नाही. त्यामुळे आम्ही ‘ओला’ कंपनीची कार मागवली. त्या गाडीतून सुखरूप घरी पोचलो व तसे आम्ही फेसबुक व व्हॉटसअपवर टाकले. तेवढ्यात ‘भावा, पार्टी तर तुझ्याच घरी होती ना. मग तू ‘ओला’च्या कारने कोणाच्या घरी गेलास?’ पार्टीत उपस्थित असलेल्या एका मित्राच्या कमेंटने आमची झोप उडाली. 

आम्ही नीट डोळे उघडून पाहिले तर खिडकीचे गज चांगले दहा-बारा फूट उंच होते व आम्ही शहाबादी फरशीवर आडवे पडलो होतो व मच्छरांनी आमच्यावर हल्ला चढवला होता. ‘आम्ही कोठे आहोत?’ हळूच आम्ही पुटपुटलो. तेवढ्यात एक हवालदार पट्टा हातात घेऊन, आमच्यावर चाल करून आला. ‘‘खरं खरं बोल, रात्री तू त्या बंगल्यात घरफोडी करण्याच्या उद्देशानेच शिरला होतास की नाही? तुझे आणखी साथीदार कोठे आहेत? आतापर्यंत किती घरफोड्या केल्या आहेस?’ असे म्हणून पट्ट्यांचे दोन फटके आमच्यावर टाकले तरीही आम्ही कळवळत म्हणालो, ‘साहेब, हॅपी न्यू इअर.’

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com